निवृत्तीनंतर व्यवसाय करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला तब्बल ७७ लाख ९५ हजार रुपयांना फसविणाऱ्या पाच जणांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. कर्करोगावर संशोधन करणाऱ्या एका औषधनिर्माण संस्थेला बिया पाठवून त्यातून दलाली मिळविण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्याला भुलून या ज्येष्ठाने पैसे गुंतवले आणि अखेरीस फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पाच पथकांनी एकाच वेळी छापे मारत पाच जणांना ताब्यात घेतले. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर येथून निवृत्त झालेल्या या ज्येष्ठ नागरिकाने स्टर्लिग बायोसायन्स डॉट कॉम या संकेतस्थळावर कर्करोग रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या बेनिव्हिला बियांचा व्यवसाय करून दलाली कमाविण्याची जाहिरात पाहिली. या बिया स्मिता इंटरप्रायझेस, बोईसर येथून विकत घेऊन त्या परदेशात पाठविल्या तर औषधनिर्माण संस्थेकडून भरघोस दलाली देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ज्येष्ठाने स्मिता इंटरप्रायझेस येथे संपर्क साधला असता स्मिता शर्मा नावाची महिला त्यांच्याशी बोलली. तिने थोडे-थोडे असे करत तब्बल ७७.९५ लाख रुपये वेगवेगळ्या ११ बँक खात्यांमध्ये जमा करण्यास सांगितले. त्यानंतर काही बिया कुरिअरने या ज्येष्ठाला पाठविण्यात तर आल्या. या बिया आमच्या परदेशस्थित कंपनीला पाठविल्या तर त्याची दुप्पट रक्कम मिळेल असे सांगण्यात आले. मात्र, या बिया घेण्यात आल्याच नाहीत. तसेच स्मिता शर्मा हिनेही प्रतिसाद देणे बंद केले. त्यामुळे अखेर याची तक्रार मुंबई पोलीसांकडे करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेच्या सायबर गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या चौकशीत नवी मुंबईतून हा प्रकार सुरू असल्याचे लक्षात आले. त्यानुसार बुधवारी शाखेच्या पाच पथकांनी एकाच वेळी खारघर, वाशी, कोपरखैराणे येथे छापा मारत एलिझाबेथ फाळके ऊर्फ स्मिता शर्मा (२९), गॉडविन चिबुकेम (३८), इमानीयल पास्कल (२४) आणि लॅनसना सिस्से (३३) यांना ताब्यात घेतले. या सर्व जणांनी मिळून तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाशी संपर्क साधून त्याला पैसे जमा करण्यास सांगितले होते. अशा प्रकारे आणखी कुणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.