माथाडी मंडळाच्या पाच कोटींचा अपहार करणाऱ्या बँक व्यवस्थापकासह पूर्वाश्रमीच्या डॉक्टरला साकीनाका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या भामट्यांनी माथाडी मंडळाच्या अपरोक्ष काढलेली पाच कोटी रुपये रक्कम अखेरीस काही कॉर्पोरेट कंपन्यांच्या पदरी पडल्याचे तपासातून पुढे आले आहे.

त्रिभुवन यादव आणि मुबारक पटेल अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. यादव ‘इंडियन ओव्हरसीज बँके’च्या साकीनाका शाखेचा तत्कालीन व्यवस्थापक आहे. तर पटेल आयुर्वेदिक पदवीधर आहे. साकीनाका पोलिसांनी पटेलचा ताबा कल्याणच्या मध्यवर्ती कारागृहातून घेतला. २०१६ मध्ये कल्याण येथील एका माथाडी मंडळाच्या १० कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी त्याला अलीकडेच खडकपाडा पोलिसांनी अटक केली होती. अकोल्याचा रहिवासी असलेला मुबारक २००१ मध्ये प्रॅक्टिस बंद करून मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवसायात उतरला.

अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार ही ठेव परवानगीशिवाय मुदतपूर्व मोडू नये आणि या ठेवीवर कोणालाही कर्ज देऊ नये, अशी सूचना मंडळाने बँकेला दिली होती. मंडळाने यावर्षी ऑक्टोबर महिन्यात मुदत ठेव सुरक्षित आहे का, त्यावर व्याजापोटी किती रक्कम जमा झाली याबाबत चौकशी केली तेव्हा ही ठेव गेल्यावर्षी एप्रिल महिन्यातच मंडळाने काढून घेतल्याची नोंद सध्याच्या व्यवस्थापकाने दाखवली. विजया बँकेच्या भांडुप शाखेच्या नावाने या रकमेचा डीडी मंडळाने नेला, असे बँकेने सांगताच मंडळाने साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ठेव काढण्यास हरकत न घेण्याबद्दल यादवला काही लाख रुपयांचा मोबदला मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

भांडुप येथील विजया बँकेच्या शाखेत मंडळाचे बनावट खाते उघडण्यात आले. तेथून हे पाच कोटी अन्य बँकेत फिरविण्यात आले आणि अखेरीस ते काही कंपन्यांच्या खात्यांत वळते करण्यात आले, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

घोटाळ्याचे स्वरूप
‘कापड बाजार आणि दुकाने मंडळ’ या मुंबईतील माथाडी मंडळाने गेल्यावर्षी मार्च महिन्यात पाच कोटींची रक्कम इंडियन ओव्हरसीज बँकेच्या साकीनाका शाखेत मुदत ठेव स्वरूपात ठेवली होती. विशेष म्हणजे मंडळ पाच कोटी रुपये अन्य राष्ट्रीयीकृत बँकेतून काढून इंडियन ओव्हरसीज बँकेच्या साकीनाका शाखेत ठेवणार असल्याची पूर्वकल्पना आरोपी पटेल याला होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.