निशांत सरवणकर nishant.sarvankar@expressindia.com

@ndsarwankar

महाविद्यालयाच्या मागील बाजूस सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवणे कठीण जात होते. ही हत्या कोणी केली असावी, हे शोधणे तर त्याहून कठीण काम होते. या पेचात पोलीस सापडले असतानाच तशाच पद्धतीच्या दुसऱ्या हत्येच्या प्रकरणातून पोलिसांना आधीच्या हत्येचाही धागा सापडला..

मुलुंडच्या वझे-केळकर महाविद्यालयामागे असलेल्या स्मशानभूमीजवळ जानेवारी महिन्यात एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. चेहरा विद्रूप करण्यात आल्यामुळे मृतदेहाची ओळख पटणे अशक्य होते. त्यामुळे पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्तीविरोधात नवघर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला व मृतदेहाची छायाचित्रे सर्व पोलीस ठाण्यांत पाठवली.

काही काळानंतर एक व्यक्ती पुढे आली. हा मृतदेह आपला भाऊ  विजय यादव याचा असल्याचा दावा तो करीत होता. परंतु पोलिसांना खात्री पटत नव्हती. त्याच्या हातावर असलेल्या निशाणीवरून तो ठामपणे सांगत होता. पोलिसांनी मग शहानिशा करण्यासाठी मृतदेह आणि संबंधित व्यक्तीची तपासणी करण्याचे ठरविले. सर्व माहिती कालिना येथील न्यायवैद्यक शाळेत पाठविण्यात आली. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.

अशातच मे महिन्यात नवघर पोलिसांनी योगेश राणे याला अटक केली. आपला सहकारी नवराज रेगमी याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा त्याच्यावर आरोप होता. हातोडय़ाने त्याने आपल्या सहकाऱ्यावरच हल्ला केला. सुदैवाने तो वाचला. मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि योगेशला बेडय़ा पडल्या. हल्ल्याचे ठिकाण होते मुलुंडच्या वझे-केळकर महाविद्यालयामागील तीच स्मशानभूमी. २२ जानेवारी रोजी याच ठिकाणी मृतदेह सापडला होता. चेहरा विद्रूप करण्यासाठी हातोडय़ाचाच वापर करण्यात आला होता. त्यामुळे संबंधित तरुणाच्या हत्येमागे योगेशच होता का, या दिशेने तपास सुरू झाला. नवराज या आपल्या सहकाऱ्यावरच योगेशने हातोडय़ाने हल्ला केला होता. गुन्ह्य़ाची पद्धत एकच होती. त्यामुळे विजय यादवची हत्या योगेशनेच केली असावी, या निष्कर्षांपर्यंत पोलीस पोहोचले होते. परंतु नुसते वाटून चालत नाही. न्यायालयात पुरावा लागतो. त्यामुळे सापडलेला मृतदेह विजय यादवचाच होता, हे पोलिसांनी सिद्ध करावे लागणार होते.

याआधी जी व्यक्ती पोलीस ठाण्यात आली होती तिला बोलावण्यात आले. ती व्यक्ती ठाम होती. २२ जानेवारी रोजी सापडलेला मृतदेह त्याचा भाऊ  विजय यादव याचाच होता, असे तो ठामपणे सांगत होता.

मुलुंड रेल्वे स्थानकाजवळील रेस्तराँ आणि बारमध्ये विजय काम करीत होता. पोलिसांचे पथक तेथे पुन्हा गेले. योगेशही त्याच बारमध्ये काम करीत होता. तेथील एक व्यक्ती जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून कामावर येत नव्हती, अशी माहिती मिळाली. पोलिसांची खात्री पटली की, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून विजय यादव असावी.

विजय यादवच्या भावाला केईएम इस्पितळात पाठविण्यात आले. तेथे जतन करून ठेवलेल्या सांगाडय़ावर संगणकीय पद्धतीने तब्बल पाच हजार छायाचित्रे तयार करण्यात आली. तो विजय यादवच होता, याची पुरेपूर खात्री पटल्यावर विजयचा मारेकरी योगेशच असावा याबाबत पोलीस ठाम होते.

आपल्यासोबत बारमध्ये काम करणाऱ्या रेगमीवर खुनी हल्ला करणारा योगेश हाच विजय यादवचा मारेकरी असल्याबाबत पोलिसांची पुरेपूर खात्री पटली. २०१४ मध्ये योगेशने एका महिलेची रायगडमध्ये हत्या केली होती. तुरुंगात असलेल्या योगेशची नवघर पोलिसांनी कोठडी घेतली आणि मग नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भोसले यांना खुनाची उकल करण्यात वेळ लागला नाही. क्षुल्लक वादावरून आपल्या सहकाऱ्याची हत्या करणाऱ्या योगेशने अखेर गुन्ह्याची कबुली दिली आहे.

एका न सुटलेल्या खून प्रकरणाची उकल करण्यासाठी आरोपी योगेशनेच पोलिसांच्या तपासाला असा हातभार लावला. आणखी एका सहकाऱ्याला तशाच पद्धतीने ठार मारण्याचा डाव अंगलट आला.