संदीप आचार्य 
मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पंचतारांकित रुग्णालयात बेड मिळणे अवघड झाले असले तरी महापालिकेच्या जम्बो रुग्ण सेवेत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन बेड तसेच आयसीयूत बेड उपलब्ध आहेत. महत्वाचे म्हणजे या जम्बो व्यवस्थेत रुग्णांना यापुढे लीलावती, ब्रिच कँण्डी, बॉम्बे हॉस्पिटल आदी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी जम्बो व्यवस्थेत गतिमान उपचार यंत्रणा निर्माण करतानाच मुंबईतील अनेक छोट्या रुग्णालयातील करोना रुग्णोपचार व्यवस्था रद्द करून लुटमारीला चाप लावला आहे.

महापालिकेच्या डोम, बीकेसी, नेस्को व मुलुंड येथील जम्बो रुग्ण व्यवस्थेत आजच्या दिवशी ऑक्सिजन व्यवस्था असलेले ४९०० बेड रिकामे आहेत तर २०० आयसीयू बेड उपलब्ध आहेत. जम्बो व्यवस्थेत करोना रुग्णांना अधिक प्रभावी उपचार मिळून गंभीर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी पालिका आयुक्त चहल यांनी जम्बो रुग्णालयांना खाजगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर मदत करतील अशी नवीन व्यवस्था निर्माण केली आहे. याबाबत आयुक्त चहल म्हणाले, डोम येथे ५५० बेड असून ३५ आयसीयू बेड आहेत याठिकाणी ब्रिच कँण्डी व बॉम्बे हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन व मदत करतील.

बीकेसीत १०८ आयसीयू बेड असून येथे लीलावती व हिंदुजातील डॉक्टर मदत करणार आहेत. नेस्कोमध्ये २००० बेड असून यातील ७०० बेड आज कार्यरत आहेत. उर्वरित बेड उद्यापासून कार्यरत होतील तसेच २२० आयसीयू बेड असून येथे नानावटी रुग्णालयातील डॉक्टर आमच्या डॉक्टरांना मार्गदर्शन व मदत करतील तर मुलुंड येथे ९०० बेड असून ३० आयसीयू बेड आहेत. याठिकाणी फोर्टिज रुग्णालयातील डॉक्टर मदत करणार आहेत. याबाबत काल बैठक झाली असून आमच्या सर्व जम्बो रुग्णालय प्रमुख व त्यांना जोडून दिलेल्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टर यांचे फोन नंबर एकमेकांना देण्यात आले असून ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष मदत या रुग्णालयांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्याचे इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले. मुंबईत आम्ही गेल्या काही आठवड्यात चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यापूर्वी चाडेचार हजार चाचण्या केल्या जायच्या त्या वाढवून साडेसात हजार व आता १० ते १२ हजार चाचण्या दिवसाकाठी आम्ही करत आहोत. यापुढे १५ हजार चाचण्या दररोज केल्या जातील असे आयुक्त चहल यांनी सांगितले.

एक महत्वाचा निर्णय पालिकेने घेतला आहे तो म्हणजे छोट्या ७३ रुग्णालयांमध्ये यापुढे करोना रुग्ण दाखल होणार नाहीत. ही रुग्णालये सामान्य रुग्णांसाठी पूर्णपणे मोकळी करण्यात आली आहेत. यामुळे या छोट्या रुग्णालयात सामान्य रुग्णांना दाखल होता येईल. एकतर या रुग्णालयात अतिदक्षता विभागात १० ते १५ बेड असतात. त्यात करोनासाठी राखीव ठेवायचे म्हटले तर रुग्णालयांनाही अडचणीचे होते तसेच रुग्ण गंभीर झाल्यावर ही रुग्णालये रुग्णाला पालिका रुग्णालयात उपचारासाठी पाठवतात. तसेच या रुग्णालयात उपचाराचे दर जास्त आकारत असल्याच्या तक्रारी होत्या. यात रुग्णवाहिकेची लुटमार, रुग्णांचे होणारे हाल आता संपल्याचे पालिकेच्या ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. रुग्ण गंभीर झाल्यावर ही रुग्णालये रुग्णाला आमच्याकडे पाठवायची. अशा रुग्णांना वाचवणे हे आव्हानच होते असेही या डॉक्टरांनी सांगितले. महापालिकेने छोट्या रुग्णालयांना करोना रुग्णांवर उपचार करण्यास बंदी केली तसेच आम्ही केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांमुळे यापूर्वी करोना रुग्णांचा जो मृत्यू दर ५.३ टक्के होता तो कमी होऊन २.४ टक्के झाला व आज करोना रुग्णांची संख्या वाढली असली तरी मृत्यू दर १.७ टक्के एवढा खाली आल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले. महापालिकेच्या शीव, नायर व केईएम रुग्णालयांप्रमाणेच पालिकेच्या जम्बो रुग्ण व्यवस्थेत सर्वोत्तम उपचार केले जात असून आता मोठ्या पंचतारांकित रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे चोवीस तास मार्गदर्शन व मदतही उपलब्ध करून देण्यात आली आहे.