आधी उद्यानासाठी झोपडी जमीनदोस्त; आता पदपथावरील झोपडेही पाडले

समीर कर्णुक, लोकसत्ता

मुंबई : राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत ठसा उमटवणाऱ्या व पंतप्रधानांकडून कौतुकाची थाप मिळविणाऱ्या मेरी नायडू या फुटबॉलपटूचे किंग्ज सर्कल येथील पदपथावरील बस्तान आता रस्त्यावर आले आहे. पदपथावरील तिचे घर काही दिवसांपूर्वी पालिकेने जमीनदोस्त केले. त्यामुळे सध्या तिच्या कुटुंबीयांना रस्त्याच्या कडेला संसार थाटावा लागला आहे.

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी मेरीची निवड झाली आहे. यामध्ये मेरीने बाजी मारल्याने २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला होता. त्यानंतरदेखील मेरीने अनेक जिल्हा आणि राज्य पातळीवरील फुटबॉल स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपली चुणूक दाखवली. या स्पर्धामध्ये तिला शंभरहून अधिक पदके व प्रमाणपत्रे मिळाली आहेत. पण हा ऐवजही रस्त्यावर आला आहे.

किंग्ज सर्कलच्या पुलाखाली मेरी अनेक वर्षांपासून दोन बहिणी आणि आई-वडिलांसोबत राहत होती. लहानपणापासून तिला खेळाची आवड होती. एका सामाजिक संस्थेने गरीब मुलांसाठी सुरू केलेल्या प्रशिक्षणात ती फुटबॉल खेळू लागली. काही दिवसांतच ती तरबेज झाली व तिने राज्यस्तरीय स्पर्धापर्यंत मजल मारली.

मेरीचे वडील पालिकेत कंत्राटी कामगार असून त्यांच्यावर मेरीसह तीन मुलींची जबाबदारी आहे. मात्र वर्षभरापूर्वी ती राहत असलेली झोपडी पालिकेने उद्यान तयार करण्यासाठी जमीनदोस्त केली. त्यानंतर या राज्यस्तरीय फुटबॉलपटूचे हालाखीच्या परिस्थितीतील जगणे उड्डाणपुलाखालून याच परिसरातील पदपथावर आले. प्रसारमाध्यमातून तिच्या व्यथेला वाचा फुटली. काही राजकीय नेत्यांनी तिची भेट घेत, तिच्या घराची, शिक्षणाची आणि प्रशिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले. मात्र नंतर फारसे कुणी फिरकले नाही.

प्रतिकूल परिस्थितीमुळे मेरीला दहावीनंतर शाळा सोडावी लागली. पुरेसे पैसे नसल्याने तिचे प्रशिक्षणदेखील गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. आता मेरीचे पदपथावरील घरही आठ दिवसांपूर्वी पालिकेने जमीनदोस्त केले. त्यामुळे सध्या रस्त्याच्या कडेला तात्पुरते छत्र उभारून ती कुटुंबासोबत राहत आहे.

बहिणींच्या शिक्षणासाठी..

मेरीच्या बहिणीही चांगल्या खेळाडू आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे मेरीचे शिक्षण आणि खेळ अर्धवटच राहिले असले तरी ही वेळ आपल्या बहिणींवर येऊ नये असे तिला वाटते. बहिणींना चांगले शिक्षण व प्रशिक्षण मिळावे यासाठी दिवसरात्र मेहनत करणार असल्याचे तिने सांगितले.