पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात राहु या गावाजवळ असलेल्या म्हशींच्या मोठ्या फार्ममध्ये म्हशींची पारडी ‘आयव्हीएफ’ पद्धतीने जन्मास आली आहेत. या पद्धतीने पारडी जन्माला घालण्याचा हा असा पहिलाच उपक्रम ‘जेकेबोवाजेनिक्स’ या ‘जेके ट्रस्ट’मधील स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने राबविण्यात आला. ही संस्था पशूसंवर्धन क्षेत्रात काम करते.सध्या ती देशभरात गुरे व म्हशी प्रजनन विकास कार्यक्रम आयोजित करते आहे.

पुण्याजवळील ‘सोनवणे बफेलो फार्म’मध्ये चार म्हशींपासून या पाच आयव्हीएफ पारडांचा जन्म झाला. यात एका जुळ्या पारडांचाही समावेश आहे. भारतात आयव्हीएफ तंत्रामार्फत जुळी पारडी जन्माला येण्याची ही पहिलीच घटना आहे. ही पारडी मुऱ्हा जातीची आहेत. म्हशींमधील जगातील नामांकित जातींपैकी ही एक जात आहे.

रेमंड समूहाचा सामाजिक उपक्रम असलेल्या ‘जेके ट्रस्ट’तर्फे गुरांच्या प्रजननासंबंधी अनेक प्रयोग करण्यात येत आहेत. राष्ट्रीय गोकुळ योजनेंतर्गत ते करण्यात येतात. आयव्हीएफ तंत्राने गाईंपासून वासरे जन्माला घालण्याचे काम ही संस्था यापूर्वीही करीत होती. आता ‘असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी’च्या सहाय्याने म्हशीचे पारडू जन्माला घालण्याचे काम या संस्थेमार्फत सुरू आहे.

याबाबतीत बोलताना रेमंड समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया म्हणाले, ‘’रेमंड समुहाच्या छत्राखालील जेकेबोवाजेनिक्स या संस्थेने आयव्हीएफ या तंत्राच्या सहाय्याने केलेल्या प्रयोगाच्या कामगिरीमुळे आम्ही समाधानी आहोत. हा अशा प्रकारचा एकमेवाद्वितीय उपक्रम असून यातून देशातील दुग्ध उत्पादन वाढण्यास मोठी मदत होऊ शकेल. आजच्या संदर्भात आपली देशी जनावरे आणि म्हशी यांच्या जातींचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या दुधात आजारांशी लढण्यासाठी उच्च पौष्टिक मूल्ये असतात. भारतात दुग्धजन्य उत्पादनांमध्ये वाढ झाल्याने खेड्यांमध्ये तळागाळात अधिक प्रगती होऊ शकते.”

गेल्या दीड वर्षात ‘जेके ट्रस्ट’ने १६ महिन्यांच्या कालावधीत (एप्रिल २०१९ ते जुलै २०२० पर्यंत) गीर जातीच्या गौरी या गाईमध्ये आयव्हीएफ तंत्राने ९४ वेळा गर्भधारणा केली आहे. या ९४ आयव्हीएफ गर्भधारणांपैकी ६४ गर्भधारणा ‘जेके ट्रस्ट’च्या फार्ममध्ये झाल्या, तर उर्वरीत ३० या शेतकऱ्यांच्या स्वतःच्या गोठ्यांमध्ये झाल्या. यातील ३९ वासरांचा जन्म झालेला आहे, तर इतर वासरे या वर्षात जन्माला येण्याची अपेक्षा आहे. या नवीन उपक्रमामुळे गुरांच्या प्रजनन तंत्रामध्ये मोठीच क्रांती घडून येणार आहे. सर्वसाधारणपणे एखादी गाय तिच्या आयुष्यभरामध्ये केवळ ८ ते १० वासरे जन्माला घालू शकत असते.

आयव्हीएफ तंत्राच्या नव्या प्रयोगामुळे मादी प्राण्यांची संख्या देशात वेगाने वाढण्याचा मार्ग सुलभ होईल. देशात प्रथमच आयव्हीएफमार्फत म्हशींच्या पारडांचा यशस्वी जन्म झाल्याविषयी भाष्य करताना जेके ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्याम झंवर म्हणाले, “भारतामध्ये १० कोटी ९० लाख म्हशी आहेत. ही त्यांची संख्या जगातील म्हशींच्या ५६ टक्के इतकी आहे. म्हशींची मुऱ्हा ही भारतीय जात जगातील नामांकीत जातींपैकी एक अशी मानली जाते. ‘असिस्टिड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी’ (एआरटी) वापरून भारतात अनुवांशिकदृष्ट्या उत्कृष्ट म्हशींची पैदास मोठ्या प्रमाणात करता येते, हे आता सिद्ध झाले आहे. परिणामी दुधाचे उत्पादन आता जास्त करता येईल. म्हशींमध्ये ‘इन-विट्रो फर्टिलायझेशन’ (आयव्हीएफ) या तंत्राचा वापर करणे गाईंच्या तुलनेत कठीण असले, तरी ‘असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी’ (एआरटी) या आधुनिक तंत्राचा अधिक प्रसार करून ते म्हशींमध्ये वापरायला हवे.”

गोठलेल्या आयव्हीएफ भ्रुणापासून पहिले आयव्हीएफ वासरू निर्माण करण्याचा प्रयोग जेकेबोवाजेनिक्स या संस्थेने ९ जानेवारी २०१७ मध्ये भारतात प्रथम यशस्वी केला. भारतात दुभती जनावरे व म्हशी यांच्या जातींचे संवर्धन करून त्यांची पैदास मोठ्या प्रमाणात करण्याचे पूरक तंत्रज्ञान विकसीत करण्याच्या उद्दिष्टाने ‘जेकेबोवाजेनिक्स’ची स्थापना ‘जेके ट्रस्ट’ने २०१६ मध्ये केली. महाराष्ट्रातील पुण्याजवळील ‘कॅटल ईटी-आयव्हीएफ लॅब’मध्ये यशस्वी चाचण्या घेतल्यानंतर, भारतीय शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने संस्थेने प्रथमच चार ‘मोबाइल ईटी-आयव्हीएफ व्हॅन’ स्थापित केल्या. या व्हॅन्स शेतकऱ्यांच्या दारात प्रत्यक्ष नेण्यात येतात. पुण्याजवळील ‘जेकेबोवाजेनिक्स’ची आयव्हीएफ सुविधा आणि गुरे संवर्धन फार्म यांना भारत सरकारच्या पशुसंवर्धन मंत्रालयाची मंजुरी आहे. भारताच्या विविध राज्यांतील भ्रूण हस्तांतरणाचे (ईटी) काम करणाऱ्या प्रयोगशाळांमधील अधिकाऱ्यांना आयव्हीएफ प्रशिक्षण देण्यासही ‘जेकेबोवाजेनिक्स’ला मान्यता मिळालेली आहे.