एका दिवसातील करोना मृत्यूंचे प्रमाण साडेतीन महिन्यांत प्रथमच कमी झाले. सोमवारी २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईत ७४३ नवे रुग्ण आढळले असून ही संख्या गेल्या काही दिवसांतील रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी आहे.

गेल्या साडेतीन महिन्यांपासून एका दिवसात ५० आणि त्यापेक्षा जास्त रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत होती. तसेच आधीच्या काही मृत्यूंचे अहवालही समाविष्ट करण्यात आल्यामुळे मृत्यूप्रमाण ५.५ च्या पुढे गेले होते. मात्र सोमवारी एका दिवसातील मृतांची संख्या घटली. २० मृतांपैकी १६ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यात १३ पुरुष आणि सात महिला होत्या. मृतांची एकूण संख्या ७४३९ वर गेली आहे.

मुंबईतील एकूण बाधितांचा आकडा १,३७,०९१ झाला आहे. तर १०२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत १,११,०८४ म्हणजेच ८१ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या १८,२६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईतील रुग्णवाढीचे प्रमाण ०.८० टक्क्यांवर गेले असून रुग्णदुपटीचा कालावधी ८७ दिवसांचा आहे. मात्र कुलाबा, गोरेगाव, वांद्रे पश्चिम, कांदिवली, बोरिवली, दहिसर या भागांत रुग्णवाढीचे प्रमाण सरासरीहून जास्त आहे.

मुंबईत ११ मे रोजी ७९१ रुग्ण आढळले होते, तर २० जण दगावले होते. त्यानंतर मुंबईतील रुग्णांचा आणि मृतांचा आकडा वाढतच गेला. जुलैनंतर दररोज आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा घटू लागला, मात्र मृत्यूचे प्रमाण कमी होत नव्हते. सोमवारी रुग्णसंख्येत आणि मृत्यूप्रमाणात घट झाली.

राज्यात ११ हजार बाधित

राज्यात गेल्या २४ तासांत ११,०१५ नव्या रुग्णांचे निदान झाले असून, २१२ जणांचा मृत्यू झाला. याच काळात १४,२१९ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले. राज्यातील रुग्णसंख्या ६ लाख ९३ झाली असून, आतापर्यंत करोनामुळे २२,४६५ जणांचा मृत्यू झाला.