सत्तर टक्के नेपाळचे; आफ्रिकेतील विद्यार्थ्यांचे प्रमाण मात्र घटले

देशातील परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून भारतात शिक्षण घेण्यासाठी येणारे सर्वाधिक विद्यार्थी हे नेपाळी आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतात शिक्षण घेण्यासाठी प्राधान्य देणाऱ्या इराण, अफगाणिस्तान आणि आफ्रिकी देशांतील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मात्र काही प्रमाणात कमी होत चालल्याचे दिसत आहे. देशभरात गेल्यावर्षी परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या साधारण दोन हजारांनी वाढली असून त्यातील सोळाशे विद्यार्थी हे नेपाळी आहेत.

देशातील उच्च शिक्षण सुविधांमध्ये सुधारणांचे दाखले शिक्षण विभागाकडून देण्यात येत असले तरीही भारतीय उपखंडातील देश वगळता इतर देशांतील विद्यार्थ्यांकडून भारतात शिक्षण घेण्यासाठी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशातील परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत आफ्रिका खंडातील देश, इराण, अफगाणिस्तान येथील विद्यार्थ्यांचा प्रतिसादही तुलनेने थंडच आहे. राष्ट्रीय उच्च शिक्षण अहवालातून ही बाब समोर आली आहे. या अहवालानुसार गेल्यावर्षी (२०१६-१७) देशातील परदेशी विद्यार्थ्यांची संख्या दोन हजार १५१ने वाढून ४७ हजार ५७५ झाली. त्यापूर्वी (२०१५-१६) देशातील एकूण परदेशी विद्यार्थ्यांची संख्या ही ४५ हजार ४२४ होती. २०१६-१७ या वर्षांत देशात एकूण ११ हजार २५० नेपाळी विद्यार्थी शिक्षण घेत होते, तर २०१५-१६ मध्ये ही संख्या नऊ हजार ५७४ होती. गेल्यावर्षी नव्याने आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांपैकी अवघे ४७५ विद्यार्थी हे नेपाळ व्यतिरिक्त इतर देशांतील असल्याचे दिसत आहे.

‘अभियांत्रिकी’लाआधार

देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर जागा रिक्त राहात असताना परदेशी विद्यार्थ्यांकडून मात्र अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यासाठी  प्रतिसाद आहे. बी.टेक. आणि बी.ई. या पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. सहा हजार ८१८ विद्यार्थ्यांनी बी.टेक.साठी तर दोन हजार ४५३ विद्यार्थ्यांनी बी.ई. या पदव्यांसाठी प्रवेश घेतला.

परदेशी विद्यार्थ्यांचे महत्त्व काय?

जगातील उच्च शिक्षणाचा आढावा घेताना प्रत्येक देशातील शिक्षणासाठी परदेशी विद्यार्थी किती उत्सुकता दाखवतात हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. उच्च शिक्षण संस्थांची जागतिक क्रमवारी निश्चित करतानाही परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येला महत्त्व दिले जाते. परदेशी विद्यार्थ्यांचा ओढा हा अर्थकारणालाही काही अंशी चालना देणारा ठरतो.