News Flash

देशात आतापर्यंत चार मुख्यमंत्री राज्यपालनियुक्त सदस्य

दोन सदस्यांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव आले असता राज्यपालांनी ते मान्य केले नव्हते

संग्रहित छायाचित्र

संतोष प्रधान

राज्य मंत्रिमंडळाने दोनदा शिफारस करूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यास राज्यपालांनी नकार देतानाच संके ताचे उदाहरण देण्यात आले. पण आतापर्यंत देशात चार मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून आमदारकी भूषविली होती.

राज्यपाल नियुक्त सदस्याने मुख्यमंत्री किंवा मंत्रिपद भूषवू नये, असे संकेत असतात. तसा नियम नाही वा घटनेत तरतूदही नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करावी, अशी शिफारस राज्य मंत्रिमंडळाने दोनदा करूनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ती मान्य केली नाही. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या दोन जागा रिक्त असल्या तरी त्यांची मुदत ५ जूनला संपुष्टात येईल. लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार एक वर्षांपेक्षा कमी कालावधी असल्यास पोटनिवडणूक घेण्याची आवश्यकता नाही. याआधी दोन सदस्यांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव आले असता राज्यपालांनी ते मान्य केले नव्हते. याच मुद्यावर ठाकरे यांच्या नियुक्तीस राज्यपालांनी बहुधा मान्यता दिलेली नसावी.

देशात आतापर्यंत चार मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. १९५२ मध्ये तत्कालीन मद्रास प्रांताच्या मुख्यमंत्रिपदी निवड झालेले ज्येष्ठ नेते राजगोपाळचारी ऊर्फ  राजाजी यांनी पोटनिवडणूक लढविण्यास असमर्थता व्यक्त केली होती, पण त्यांची राज्यपालांनी नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती के ली होती. १९६१मध्ये उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रभान गुप्ता यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या निवडीला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. पण उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली होती.

इतर मागासवर्गाला आरक्षणाचे लाभ मिळाले त्या मंडल आयोगाचे अध्यक्ष बी. पी. मंडल यांची १९६८मध्ये बिहार विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीनंतर त्यांची बिहारच्या मुख्यमंत्रिपदी अल्प काळासाठी निवड झाली होती. १९७१ मध्ये टी. एन. सिंग यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली होती. त्यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. सिंग यांच्या निवडीस आव्हान देण्यात आले होते, पण न्यायालयाने सिंग यांना दिलासा दिला होता.

महाराष्ट्रात अलीकडच्या काळात दत्ता मेघे, फौजिया खान या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त सदस्य असताना मंत्रिपद भूषविले होते.

मुख्यमंत्रिपद भूषवलेले राज्यपाल नियुक्त सदस्य

*   राजगोपाळचारी –  मद्रास राज्य – १९५२

*  चंद्रभान गुप्ता – – उत्तर प्रदेश – १९६१

*  बी. पी. मंडल –  – बिहार – १९६८

*  टी. एन. सिंग – उत्तर प्रदेश – १९७१

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2020 12:30 am

Web Title: four chief ministers have been appointed in the country abn 97
Next Stories
1 कूपर रुग्णालयात निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण
2 काळजी वाढली! मुंबईत ५१० नवे करोना रुग्ण, १८ मृत्यू, संख्या ९ हजाराच्याही पुढे
3 मुंबई: खासगी रुग्णालयात १५ दिवसाचे करोना उपचाराचे बिल १६ लाख, तरीही रुग्णाचा मृत्यू
Just Now!
X