नामांकित महाविद्यालयांत जागा वाढविण्याबाबत चाचपणी

अकरावी प्रवेशाचा तिढा सोडवण्यासाठी नामांकित महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढवण्याच्या पर्यायाची शिक्षण विभागाकडून चाचपणी करण्यात येत आहे. प्रवेश क्षमतेत वाढ करण्याबाबत महाविद्यालयांचे प्राचार्य आणि व्यवस्थापनाशी चर्चा करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी सांगितले. दरम्यान, इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांचे लेखी परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्याचा शासनहट्टही अद्याप कायम आहे.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी रोज नवनव्या पर्यायांची चाचपणी शासनाकडून सुरू आहे. मुळात दहावीला उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा अकरावीच्या उपलब्ध जागांची संख्या अधिक आहे. मात्र, इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या चढय़ा गुणांमुळे नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशात राज्य मंडळाचे विद्यार्थी मागे पडण्याची शक्यता आहे. त्या पाश्र्वभूमीवर आता विद्यार्थ्यांकडून मागणी असलेल्या, नामांकित महाविद्यालयांमधील प्रवेश क्षमता वाढवण्याचा विचार शासन करत आहे.  याबाबत तावडे यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. तावडे म्हणाले, ‘महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाच्या जागा वाढविण्यासंदर्भात संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य आणि व्यवस्थापन यांच्याशी चर्चा करण्यात येईल. यासंदर्भात संबंधित महाविद्यालयाने अधिक जागांसाठी अनुकूलता दर्शविल्यास त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता राज्य सरकारकडून घेण्यात येईल. तसेच अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळेपत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेला विलंब केला जाणार नाही.’

केंद्रीय शिक्षण मंडळ (सीबीएसई), आयसीएसई या मंडळांच्या विद्यार्थ्यांचे फक्त लेखी परीक्षेचे गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. ‘याबाबत सीबीएसई, आयसीएसई या मंडळांशी चर्चा सुरू असून राज्यमंडळासह सर्वच मंडळांचे गुण समान पातळीवर आणण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे,’ असेही तावडे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दहावीचा निकाल, अकरावी प्रवेश प्रक्रिया यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दहावीला अंतर्गत मूल्यमापन पुन्हा सुरू करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली. ‘आदित्य ठाकरे यांनी अकरावीच्या प्रवेशासंदर्भात काही सूचना दिल्या असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. त्यानुसार शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल, असे तावडे यांनी सांगितले.

छोटी, नवी महाविद्यालये अडचणीत

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी नामांकित, विद्यार्थीप्रिय महाविद्यालयांमधील जागा वाढवण्याच्या पर्यायामुळे लहान महाविद्यालयांना मात्र अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. मोठय़ा महाविद्यालयांना त्यांच्याकडील वाढीव विद्यार्थीसंख्येला पुरेशा सुविधा, शिक्षक उपलब्ध करून देण्याचा ताण येईल. मात्र, यंदा निकाल कमी लागल्यामुळे तुलनेने लहान महाविद्यालयांना विद्यार्थी शोधण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने शिक्षकही अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे.