News Flash

महाविद्यालयांच्या चुकीचा ३० विद्यार्थ्यांना फटका

आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने प्रवेश देणे नाकारले आहे.

संग्रहित छायाचित्र

यंत्रणेतून प्रवेश रद्द न केल्याने अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतूनच अपात्र

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये सुमारे ३० विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या चुकीमुळे प्रवेश रद्द करणे शक्य झालेले नाही. महाविद्यालयांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्याची कारणे देत या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले. अशा वेळेस महाविद्यालयांनी या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करायला हवे होते. म्हणजे हे विद्यार्थी पुढील फेरीकरिता पात्र ठरले असते. परंतु त्यांच्याकडील यंत्रणेमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेशच रद्द केले नाहीत. दिलेल्या मुदतीमध्ये या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द न झाल्यामुळे आता हे विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेबाहेर पडले आहेत. महाविद्यालयांच्या बेजबाबदार वर्तनाचा फटका मात्र विद्यार्थ्यांना नाहक सहन करावा लागतो आहे.

नव्या नियमानुसार, प्रवेश फेरीमध्ये पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात वा शाखेकरिता जागावाटप झाल्यास तिथे प्रवेश निश्चित करणे विद्यार्थ्यांला बंधनकारक आहे. परंतु आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने प्रवेश देणे नाकारले आहे. त्यामुळे प्रवेश घेण्याची इच्छा असूनही हे विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेबाहेर राहिले आहेत. पहिल्या फेरीनंतर उडालेला हा गोंधळ सावरण्यासाठी अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची मुभा दुसऱ्या प्रवेश फेरीनंतर महाविद्यालयांना देण्यात आली होती. महाविद्यालयांनी प्रवेश रद्द केल्याची पावती घेऊन चर्नीरोडच्या बी.जे.पी.सी. महाविद्यालयात अर्जामध्ये बदल करण्यासाठी विद्यार्थ्यांना जाण्याची सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत देण्यात आली. यानुसार, दुसऱ्या प्रवेश फेरीमधील १००हून अधिक विद्यार्थ्यांनी बी.जे.पी.सी. महाविद्यालयात जाऊन प्रवेश रद्द केले आहेत.  राज्य महामंडळाव्यतिरिक्त  इतर मंडळाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत शाळा सोडल्याचा दाखला प्राप्त न झाल्यामुळे अनेकांना प्रवेश रद्द करावे लागले आहेत.

काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करण्याबाबत कोणतीही सविस्तर माहिती न देता थेट बी.जे.पी.सी. महाविद्यालयात जाण्याची सूचना केली. परंतु महाविद्यालयांनी त्याच्याकडील यंत्रणेमध्ये प्रवेश रद्द न केल्यामुळे बी.जे.पी.सी. महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनाही त्यांचे प्रवेश रद्द करणे शक्य झालेले नाही. प्रवेश रद्द करण्याची अंतिम मुदत गुरुवारी होती. महाविद्यालयाने दिशाभूल केल्याचा फटका सुमारे ३० विद्यार्थी आता तिसऱ्या फेरीमधून बाहेर पडले आहेत.

चौथ्या फेरीचा आधार

दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश रद्द करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीमध्ये सहभागी होता आलेले नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आता चौथ्या फेरीत संधी देण्यात येणार आहे. यासाठी त्यांनी ३० ते ३१ जुलै या काळात महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश रद्द करायचा आहे. प्रवेश रद्द केल्याची संगणकीकृत पावती घेऊन गेल्यानंतर बी.जे.पी.सी. महाविद्यालयामध्ये त्यांच्या प्रवेश अर्जामध्ये बदल करण्यात येईल. त्यानंतर होणाऱ्या चौथ्या प्रवेशफेरीमध्ये त्यांना बदलेल्या अर्जासह सहभागी होता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 3:29 am

Web Title: fyjc online admission issue
Next Stories
1 शितपच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई
2 पायाच्या अंगठय़ात, दातांत कुंचला धरून भविष्याचे सुखद चित्र
3 खाऊखुशाल : पोटासोबत मनाची तृप्ती
Just Now!
X