मोरया मोरयाचा जयघोष सातासमुद्रापारही तितक्याच उत्साहात घुमतो आहे. देशाबाहेर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या आता शंभरच्या आसपास पोहोचल्याचे दिसते. गणेशोत्सवादरम्यान आलेल्या सुटीचा फायदा घेऊन बहुतेक परदेशस्थ गणेश मंडळांनी शनिवारी आणि रविवारी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्याचे बेत आखले होते.
एकटय़ा अमेरिकेतच पन्नासावर मराठी मंडळे यंदा गणेशोत्सव साजरा करीत आहेत. यातील बहुतांश मंडळे बृहन्महाराष्ट्र मंडळाशी संलग्न आहेत. अमेरिकेपाठोपाठ मराठी टक्का ब्रिटनमध्ये जास्त असल्याचे दिसते. लंडनखेरीज सात ते आठ शहरांमध्ये यंदा मोठय़ा प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होत आहे. याशिवाय फ्रान्स, हॉलंड, जर्मनी, टांझानिया, कुवैत, कतार, दुबई, आबुधाबी, सिंगापूर, जपान, हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया येथेही मराठी मंडळांच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे.अनेक शहरांमध्ये मराठी मंडळांची स्थापना झाली आहे.
सिंगापूर
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर गेली १९ वष्रे गणेशोत्सव साजरा करीत आहे. यंदाच्या उत्सवाची संकल्पना कलामंजिरी अशी होती, असे आयोजकांनी सांगितले. विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम, गाणी असा भरगच्च कार्यक्रम आखला होता. १३ तारखेला गणपतीचे विसर्जन झाले. तरी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम मात्र शनिवार आणि रविवारी ठेवण्यात आले आहेत. २२ सप्टेंबरला प्रसिद्ध साहित्यिक द. मा. मिरासदार यांचा कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियात ढोल पथक
वेस्टर्न सिडनी गणेशोत्सव मंडळ गेली काही वष्रे धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करीत आहे. ब्रिस्बेन, व्हिक्टोरिया, पर्थ, मेलबर्न येथील स्थानिक मराठी मंडळेही गणेशोत्सव साजरा करताहेत. सिडनीमध्ये स्थायिक झालेल्या पुण्यातील काही तरुणांनी तिथे ढोल पथकही तयार केले आहे. आता असेच ढोल पथक यंदाच्या वर्षी अ‍ॅडलेडमध्येही घुमणार आहे.
अमेरिकेत भरगच्च कार्यक्रम
न्यूयॉर्क, सॅन दिएगो, लॉस एंजेलिस या ठिकाणी सुटीला जोडून गणेशोत्सव साजरा होत आहे. गणपतीच्या मिरवणुकीसाठी ढोल, ताशे, लेझीमची जय्यत तयारी आहे. अनेक ठिकाणी स्थानिक कलाकारांनी एकत्र येऊन नाटक बसविले आहे आणि मराठी गाण्यांचा कार्यक्रमही आयोजित केला आहे. फिलाडेल्फिया गणेश फेस्टिवल ८ सप्टेंबरपासूनच सुरू झाला आहे. ८ ते १८ सप्टेंबरदरम्यान भरगच्च कार्यक्रम आयोजित केल्याचे अनिरुद्ध पोतनीस यांनी सांगितले. ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांचा कार्यक्रम यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण होता. शनिवार आणि रविवारी ‘इंडिया फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. फक्त मराठीच नाही, तर संपूर्ण भारतातील संस्कृती दर्शन घडवण्याचा मानस आहे. त्यासाठी राजस्थान आणि गुजरातमधून आलेल्या गटांचे वेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे पोतनीस यांनी सांगितले. अमेरिकेत स्थायिक झालेली अनेक कुटुंबे घरगुती गणेशोत्सवदेखील साजरा करतात. तुषार मेहेंदळे यांनी घरच्या गणपतीची मूर्ती खास पेणहून मागवल्याचे सांगितले. गणेशोत्सवासाठी सुट्टीची गणिते जमवणे अवघड असल्याने अमेरिकेत काही मंडळे २१, २२ सप्टेंबरला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार आहेत.
ब्रिटनमध्ये उत्साह
लंडनचे महाराष्ट्र मंडळ गेली आठ दशके कार्यरत आहे. गेली २३ वर्षे अखंडपणे गणेशोत्सवही साजरा होत आहे. लंडन महाराष्ट्र मंडळाखेरीज लंडनच्या उपनगरांतही गेल्या पाच- सहा वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होत आहे. स्थानिक प्रशासनाने शाडूच्या गणेशमूर्तीचे थेम्स नदीत विसर्जन करण्याला काही वर्षांपूर्वी परवानगी दिली. त्यानंतर वाजतगाजत, ढोलताशांच्या निनादात विसर्जनाची मिरवणूक काढली जाते. लंडनचे पश्चिमेकडील उपनगर हौन्सलो येथे गेली सहा वष्रे हौन्सो गणेश मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा केला जातो. दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम उत्साहाने साजरे झाले. शिवाय उत्सवकाळात महाराष्ट्रीय तसेच देशी खाद्यपदार्थाचे स्टॉल लागले होते. त्यानिमित्त भारतीय खाद्यमहोत्सवही साजरा होतो, असे या मंडळाचे वैभव रावराणे म्हणाले. लंडनबाहेर मिल्टन किन्स, इलफर्ड, रीडिंग, स्लाव, बेझिंगस्टोक, मिडलँड्स, लीड्स, मँचेस्टर या यूकेमधील इतर मराठी मंडळांनी गणेशोत्सव काळात भरगच्च कार्यक्रम ठेवले आहेत. दीड, पाच किंवा दहा दिवसांचे गणपती येथे बसवले जाताहेत. स्थानिक कलाकारांचे नाटक, गाणी, महाराष्ट्राची लोकधारा यांसारखे कार्यक्रम सादर करतात.
लागोसमध्ये कलावंत
पश्चिम आफ्रिकेत वास्तव्यास असलेल्या मराठमोळ्या बांधवांनी यंदा लागोसमध्ये मोठय़ा धुमधडाक्यात रौप्यमहोत्सवी गणेशोत्सव साजरा केला. १९७९ मध्ये महाराष्ट्र मंडळ, लागोस या संस्थेची स्थापना करण्यात आली. १९८९ मध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.  महाराष्ट्र मंडळ, लागोस आणि हिंदू मंदिर फाऊंडेशन, नायजेरिया यांनी एकत्रितपणे यंदा रौप्यमहोत्सवी गणेशोत्सव साजरा केला. पुष्कर श्रोत्री, अजित परब, जितेंद्र जोशी, अमेय दाते, अनंदी जोशी, मधुरा दातार, भार्गवी चिरमुले हे कलावंत लागोसला रवाना झाले होते.