गणेशोत्सव मंडळांना मंडपांसाठी तातडीने परवानगी दिली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरुन महाआरती करेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे कोणतेही चुकीचे काम करत नसून त्यांच्या परवानग्यांमध्ये अडचणी आणू नका, असेही त्यांनी म्हटले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मरिन लाईन्स येथील बिर्ला सभागृहात गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाचा पाढाच वाचून दाखवला. पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, गणेशोत्सवामुळे लोक एकत्र येतात, त्यामुळे उत्सवात काहीही गैर होत नाही. हा उत्सव आनंदात साजरा झाला पाहिजे, अशी शिवसेनेची ठाम भूमिका असून आम्ही गणेशोत्सव मंडळांसोबत आहोत. त्यांना परवागी देण्यात अडथळे आणल्यास आम्हीही रस्त्यावर उतरू, असे त्यांनी सांगितले.

मंडपांचा वाद नेमका काय?
गिरगावातील अरुंद गल्ल्यांमध्ये गणेशोत्सवाचे मोठे मंडप घालण्यास मनाई केल्यावरून गिरगावात वातावरण तापले आहे. पादचारी व वाहतुकीला अडथळे ठरणाऱ्या रस्त्यावरील मंडपांना परवानगी दिली जाऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार महानगरपालिका मंडळांना परवानगी देते. उंच मूर्ती व भव्य मंडपांसाठी प्रसिद्ध असलेल्या गिरगावातील अरुंद गल्ल्यांमध्ये महिनाभर आधीपासून गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मात्र रस्ते अडवणाऱ्या मंडपांना महानगरपालिकेच्या डी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मनाई केली आणि हा वाद पेटला.