|| प्रसाद रावकर

मंडळांचा निधी आटल्याने सामाजिक उपक्रमांवर संक्रांत :-गणेशोत्सवापूर्वी पूरग्रस्तांना केलेली मदत, दानपेटीमध्ये जमणारी रक्कम पूरग्रस्तांसाठी देण्याबाबत केलेली घोषणा, राजकारण्यांनी घेतलेला आखडता हात, पावसाच्या रुद्रावतारामुळे भाविकांनी फिरवलेली पाठ, मंडळाच्या उत्पन्नावर आकारण्यात येणारा वस्तू आणि सेवा कर आदी विविध कारणांमुळे मुंबईमधील बहुसंख्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची आर्थिक कोंडी झाली आहे. गणेशोत्सवानिमित्त साकारलेली सजावट, उभारलेला मंडप, प्रकाशयोजना आदींचे पैसे अद्याप द्यायचे बाकी आहेत. गेल्या वर्षीचा निधी संपल्याने आणि यंदा निधी मिळण्याची शक्यता धुसर झाल्याने भविष्यातील मंडळांच्या सामाजिक उपक्रमांवर संक्रांत येण्याची चिन्हे आहेत.

कोल्हापूर, सांगली परिसरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी धाव घेतली. अन्नधान्यसह आर्थिक मदतीचा हात पुढे करीत जमेल तेवढी मदत केली. तर गणेशोत्सवात दानपेटीत जमा होणारी रक्कमही पूरग्रस्तांना देण्याची घोषणा काही मंडळांनी केली. त्यातच यंदा गणेशोत्सवावर सुरुवातीपासून पावसाचे मळभ दाटून आले आहे. दरवर्षी दीड आणि गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर मंडळांमध्ये गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. मात्र यंदा सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भाविकांनी मंडपांकडे पाठ फिरविली आहे. भाविकांअभावी मंडप ओस पडले होते. त्यामुळे दानपेटीमध्येही फारशी भर पडलेली नाही.

लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राजकारण्यांकडून मोठी आर्थिक मदत मिळू शकेल, अशी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र राजकारण्यांनी घेतलेला आखडता हात आणि आर्थिक मंदीमुळे जाहिरातींचा ओघ आटल्याने मंडळांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. गणेशोत्सवात भाविकांकडून गणरायाच्या चरणी अर्पण करण्यात येणाऱ्या देणगीचा मंडळांना आसरा होता. पण पावसामुळे तीही शक्यता मावळली आहे.

गेल्या वर्षीच्या शिलकीतील काही निधी मंडळांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिला. यंदा जाहिरात, देणगीतून मिळणाऱ्या निधीतून गणेशोत्सवाचा खर्च भागविण्याचा मंडळांचा मानस होता. परंतु यंदा अत्यंत कमी निधी मिळाल्याने मंडळांच्या तोडचे पाणी पळाले आहे. आतापर्यंत केलेल्या खर्चापैकी काही देणी अद्याप दिलेली नाहीत. यासाठी आता निधी कसा उभा करायचा असा प्रश्न मंडळांसमोर आहे. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे पुढील वर्षभरात विविध सामाजिक उपRम राबविण्यासाठी पैसे कुठून आणायचे या विवंचनेत पदाधिकारी आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देणगीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे भविष्यातील मंडळाच्या सामाजिक उपक्रमावर परिणाम होऊ  शकतो. पण त्यातून मार्ग काढण्यात येईल.-शंकर हराळे, सरचिटणीस, खेतवाडी १२ वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

पंढरपूरच्या वारीच्या माध्यमातून तरुणांसाठी चलत्चित्राच्या माध्यमातून प्रबोधनात्मक देखावा साकारण्यात आला. पण पावसामुळे भाविकांची फारशी गर्दी नाही. सोमवारपासून थोडीफार गर्दी झाली. यंदा प्रायोजकांनीही आखडता हात घेतला आहे. त्यामुळे मंडळाच्या निधीवर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीच्या शिलकीतून पूरग्रस्तांना मदत केली. पण भविष्यात मदत करण्याची वेळ आली तर निधी कसा उभा करायचा असा प्रश्न आहे.– अभिषेक घाग, कार्याध्यक्ष, अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ, घाटकोपर.