नेहमी वाजत गाजत येणाऱ्या आणि तेवढ्याच धुमधडाक्यातील विसर्जन मिरवणुकीतून निरोप घेणाऱ्या गणरायाच्या उत्सवावरही यंदा करोनामुळे विघ्न आलं आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव कसा असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्या संदर्भात आता राज्याच्या गृहखात्यानं एक नियमावली जाहीर केली आहे. त्यात गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या उंचीपासून ते विसर्जनापर्यंत सर्व नियम देण्यात आले आहेत.

राज्याच्या गृह खात्यानं शनिवारी काढलेल्या नियमावलीनुसार गणेश मंडळांना यंदा बिचवर किंवा तलावांमध्ये गणपती विसर्जन करता येणार नाही. नागरिकांनीही त्यांच्या घरच्या गणपतीचं घरीच विसर्जन करावं, असंही नियमावलीत म्हटलं आहे.

२२ ऑगस्टपासून गणेशोस्तवाला सुरूवात होणार आहे. पण करोनामुळे या उत्सवावर विघ्न आलंय. हा उत्सव यंदा धुमधडाक्यात करता येणार नाही. त्यासंदर्भात गृहखात्यानं शनिवारी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, गणेश मंडळांच्या बाप्पाची मूर्ती जास्तीत जास्त चार फूट उंच असावी. घरी स्थापना करण्यात येणाऱ्या गणपतीची मूर्ती दोन फुटांपेक्षा अधिक नसावी, असंही नियमावलीत म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील गणेश मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. त्यात त्यांनी गणपती बाप्पाची मूर्तीची उंची कमी ठेवण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या.

गृह खात्याचे मुख्य सचिव अमिताभ गुप्ता यांनी काढलेल्या या नियमावलीमध्ये नागरिकांनाही काही सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी गणेशाचं घरीच विसर्जन करावं. तसेच त्यासाठी बिचवर, तलावावर जाणं टाळावं. असं केल्यानं तुम्ही स्वतःला करोनापासून दूर ठेवत आहातच शिवाय कुटुंबालाही सुरक्षित ठेवणार आहात, असेही या आदेशात म्हटलं आहे.