13 August 2020

News Flash

घाटकोपरमधील घरकाम करणारी महिला करोनामुक्त

घाटकोपरमध्ये ७ मार्चला अमेरिकेहून आलेल्या एका ४९ वर्षीय व्यक्तीला करोना झाल्याचे १७ मार्च रोजी उघडकीस आले होते.

सलग दोन चाचण्या निगेटिव्ह; मुंबई महानगर परिसरात आणखी १० रुग्ण, एकूण आकडा ६८ वर

 

मुंबई : घाटकोपर येथील झोपडपट्टीत राहणारी घरकाम करणारी ६८ वर्षीय  महिला करोना या आजारातून मुक्त झाली आहे. तिच्या सलग दोन चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. विशेष म्हणजे या महिलेच्या संपर्कात आलेल्यांच्या चाचण्याही आधीच निगेटिव्ह आल्या आहेत.  झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलेला या आजाराची लागण झाल्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाची झोप उडाली होती.

घाटकोपरमध्ये ७ मार्चला अमेरिकेहून आलेल्या एका ४९ वर्षीय व्यक्तीला करोना झाल्याचे १७ मार्च रोजी उघडकीस आले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली असता त्यांच्या घरी घरकाम करणाऱ्या ६८ वर्षीय महिलेलाही करोना झाल्याचे आढळले. १७ मार्चलाच या महिलेला तत्काळ कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ही महिला झोपडपट्टीत राहत असून आणखी काही घरात घरकाम करीत असल्याचे समजल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला होता.

या महिलेच्या संपर्कात आलेल्याना हुडकून पालिकेने त्यांची तपासणी केली होती. महिला इतर तीन घरांत काम करत होती. त्यातील दोन घरांतील कुटुंबीयांची चाचणीही करण्यात आली होती. तसेच या महिलेच्या मुलाचीही चाचणी करण्यात आली होती. अशा नऊ जणांची चाचणी करण्यात आली होती. या सर्वाची चाचणी नकारात्मक आली आहे.

आता या महिलेच्या सलग दोन चाचण्या नकारात्म आल्या असून ती कोरोनातून बरी झाली असल्याचे निश्चित झाले आहे. त्याच बरोबर महानगर पालिकेने केलेल्या तपासणीत या परीसरात एकही रुग्ण सापडलेला नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून या संपूर्ण परीसराचे निर्जतूंकीकरण करण्यात आले आहे. सध्या या परीसरात सर्दी, ताप, खोकला अशी प्राथमिक लक्षणे आढळलेली नाहीत. मात्र, या परिसरातील नागरीकांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. हा परीसर र्निजतुक करण्यासाठी अग्निशमन दलाच्या बंबांचा वापर केला जात आहे. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य सरकारने सर्व प्रकारची खबरदारी घेतलेली तरी बुधवारी संपूर्ण मुंबई महानगर परिसरात एकूण १० नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी मुंबईतील ७ जण आहेत तर नवी मुंबईतील २ तर एक ठाण्यातील आहे. त्यामुळे मुंबई महानगरातील करोना बधितांचा आकडा ६८ वर गेला आहे.

आरोग्य यंत्रणा रोज नव्याने येणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीवर लक्ष ठेवून आहे. बुधवारी मुंबई आणि परिसरात दिवसभरात १० नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यापैकी ७ रुग्ण मुंबईतील असून १ रुग्ण ठाण्यातील आहे. एक ५७ वर्षांचा पुरुष नवी मुंबईतील आहे. तो आधीच्या एका पॉझिटिव्ह रुग्णाचा निकटवर्ती आहे, तर ३८ वर्षांचा पुरुष कामोठे येथील असून तो त्रिनिदाद येथून आला होता. तर मुंबईतील सात पैकी दोन रुग्ण हे अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरातीतून आले होते.

महापालिकेने दुपारी २ वाजेपर्यंत दिलेल्या आकडेवारीनुसार बाह्यरुग्ण विभागात दिवसभरात ४३० रुग्ण तपासण्यात आले. सध्या रुग्णालया एकूण १०३ संशयित रुग्ण भरती असून आंतराष्ट्रीय प्रवास करून आलेले  ४१७ प्रवासी अलगीकरण केलेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 12:50 am

Web Title: ghatkopar house wife women corona virus corona free akp 94
Next Stories
1 संचारबंदीमुळे एकाकी ज्येष्ठ नागरिक, अपंगांच्या अडचणीत वाढ
2 २१ दिवसांच्या काळजीने गॅस एजन्सीतही गर्दी
3 पोलिसांसोबत आता स्वयंसेवकांची फौज
Just Now!
X