साहित्य संमेलनाचा उद्घाटन आणि समारोप सोहळ्याच्या थेट प्रसारणासाठी पैसे देणे योग्य वाटत नाही, तसेच केवळ घुमान नव्हे तर या पुढील प्रत्येक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन व समारोप सोहळा कोणतेही शुल्क न आकारता दूरदर्शनच्या ‘सह्य़ाद्री’ वाहिनीने प्रसारित करावा, अशी भूमिका घुमान साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी घेतली आहे.
गेल्या काही वर्षांपासून विविध ठिकाणी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या ‘सह्य़ाद्री’ वाहिनीवरून केले जाते. मात्र त्यासाठी काही लाखांची रक्कम दूरदर्शनला द्यावी लागते.
मात्र यंदाच्या घुमान संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी ‘सह्य़ाद्री’ वाहिनीने कोणतेही शुल्क न घेता हे प्रसारण करावे, अशी भूमिका घेतली आहे. यापुढे प्रत्येक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन व समारोप सोहळ्याचे थेट प्रसारण विनाशुल्क केले जावे.
तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष देसडला म्हणाले, हे संमेलन म्हणजे मराठी भाषेचा उत्सव आहे. दूरदर्शनची ‘सह्य़ाद्री’ वाहिनी ही शासकीय आहे. त्यामुळे या माध्यमाने सोहळ्याच्या थेट प्रसारणासाठी शुल्क आकारणे आणि आम्ही ते देणे योग्य वाटत नाही. केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी थेट प्रसारण नको. त्यापेक्षा ते नाही झाले तरी चालेल, अशी भूमिका स्वागताध्यक्ष म्हणून घेतली आहे.
दरम्यान या बाबत ‘सह्य़ाद्री’ वाहिनीचे संचालक मुकेश शर्मा यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी, यात काय करता येईल याबद्दल मला आत्ता लगेच काही सांगता येणार नाही, असे सांगितले.