वेश्याव्यवसायातून सुटका झालेल्या मुलीला बारावीत ४५ टक्के
वर्षभरापूर्वी वेश्याव्यवसायातून मुक्तता होऊन देवनारच्या आधारकेंद्रात ती आली तेव्हा भूतकाळातील अंधकार तिला भविष्याकडे पाऊल टाकतानाही दरडावत होता. आपल्या आयुष्याचे पुढे काय होणार, हा प्रश्न तिला सतावत होता. मात्र, एका स्वयंसेवी संस्थेने तिच्याशी संपर्क साधल्यानंतर तिच्या मनात शिक्षणाची आस निर्माण झाली. शरीराचे लचके तोडणाऱ्या कुंटणखान्याच्या विश्वातून बाहेर पडून तिने पुस्तकं हाती घेतली आणि वाणिज्य शाखेतून ४५ टक्क्यांची कमाईही केली. आता पदवीचे शिक्षण घेऊन समाजकार्य करत शरीरविक्रयाच्या व्यवसायात अडकलेल्या मुलींची सुटका करण्याचा तिचा निर्धार आहे.
मे २०१५ मध्ये मुंब्य्रात अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलले जात असल्याची माहिती डायघर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकत दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली. १६ वर्षांची एक मुलगी आणि १७ वर्षांच्या रोशनीला (नाव बदलले आहे) ‘बाल कल्याण समिती’च्या आदेशानुसार, महिला व बाल कल्याण विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या देवनार येथील मुलींच्या आधारकेंद्रात पाठविले गेले. सहा महिने केवळ आधार केंद्रात बसून काढलेल्या या मुलीच्या संपर्कात ‘सेव्ह द चिल्ड्रन इंडिया’चे स्वयंसेवक आले. तिच्याशी संवाद साधल्यानंतर आपल्याला आणि आपल्या मोठय़ा बहिणीला आपल्या पालकांनी वेश्याव्यवसायात कसे ढकलले याची कहाणी तिने सांगितली. या मुली कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. परंतु, त्यांच्या पालकांनी दोन्ही मुलींच्या शरीराचा सौदा करण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी तिची त्या नरकातून सुटका केली. पालकच रोशनीला वेश्याव्यवसायात ढकलत असल्याने बाल कल्याण समितीने तिला आधार केंद्रातच ठेवण्याचे ठरवले. ‘सेव्ह द चिल्ड्रन इंडिया’च्या विभागप्रमुख ज्योती ताजणे यांनी तिला शिकण्याची इच्छा आहे का, असे विचारले तेव्हा तिने होकार दिला. मग विशेष शिक्षकाच्या मदतीने रोशनीचे शिक्षण सुरु झाले. जेमतेम तीन महिने हाती असताना जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रोशनीने अभ्यासाला सुरुवात केली.
‘नरकयातना भोगत असतानाही रोशनीने आपला अभ्यास सोडला नव्हता. पुरेशी हजेरी नसल्याने अकरावीत ती नापास झाली होती. कुटुंबीयांना तिच्या शिक्षणाशी काहीच देणे-घेणे नव्हते. पण, तिने त्यातून वाट काढत १२वीची पायरी गाठली. त्यामुळे तिला पूर्ण मदत करण्याचे आम्ही ठरवले,’ असे ज्योती ताजणे यांनी सांगितले. रोशनीच्या यशामुळे आधार केंद्रात आशेची नवी पालवी फुटली आहे. १२वीची परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेली रोशनी ही पहिलीच मुलगी असल्याने ‘सेव्ह द चिल्ड्रन इंडिया’च्या उत्साहाला पारावार राहिला नाही. रोशनीला वाणिज्य शाखेत पदवी मिळवायची आहे. वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलेल्या मुलींना सोडवून त्यांना पुन्हा सन्मानाने जगण्यासाठी मदत करण्यासाठी आयुष्य वेचण्याचा तिचा निर्धार आहे.

परीक्षा देतानाही अडचणींचा सामना
परीक्षेचे हॉलतिकीट मिळाल्यानंतर स्वयंसेवकांनी रोशनीला कोणत्या महाविद्यालयात परीक्षा देता येईल, याची चौकशी केली. आधार केंद्रात असल्याने मुलींना बाहेर जाताना पोलिसांच्या बंदोबस्ताशिवाय जाता येत नव्हते. परीक्षार्थी पोलिसाबरोबर येणार हे कळल्यावर परीक्षा केंद्र असलेले महाविद्यालयाने तिची परीक्षा घेण्यास नकार दिला. पोलीससोबत येणार म्हणजे ती गुन्हेगारच असणार, असा तिच्याविषयी समज झाल्याने त्यांनी ‘राज्य शिक्षण मंडळा’कडून परवानगी आल्याशिवाय परीक्षा घेता येणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर, संस्थेने विशेष परवानगी आणून रोशनीला परीक्षा देण्याचा मार्ग मोकळा करून दिला.