माटुंगा ते शीवदरम्यानची घटना; विद्याविहारजवळ लोकलच्या धडकेत १७ वर्षीय विद्यार्थिनी ठार

मुंबई : सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलमधील गर्दीमुळे लोकलमधून पडून गुरुवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास तेजश्री वैद्य ही २३ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली. या तरुणीवर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापाठोपाठ विद्याविहार येथे लोकलच्या धडकेत ज्योती वर्मा (१७) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे लोकलच्या गर्दीमुळे आणि रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यात रेल्वे प्रशासन अपयशीच ठरल्याचे दिसून आले आहे.

साठे महाविद्यालयात तेजश्री  पत्रकारितेचे पदव्युत्तर  अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. गुरुवारी तेजश्री परीक्षेसाठी दक्षिण मुंबईत आल्याने ती सकाळी घाटकोपर येथून रेल्वेमध्ये बसली. त्यानंतर साधारण साडेनऊच्या सुमारास ती शीव ते माटुंगादरम्यान लोकलमधून गर्दीमुळे तोल जाऊन रुळांजवळीलच गटारात पडली. या घटनेची एका प्रवाशाने लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर तासाभराने घटनास्थळी पोहचलेल्या लोहमार्ग पोलिसांना तेजश्री गटारामध्ये पडलेली आढळली. त्यावेळी जखमी झालेली तेजश्री मदतीची याचना करत होती. तात्काळ लोहमार्ग पोलिसांनी तिला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले. या अपघातामध्ये तेजश्रीच्या डोक्याला मोठी इजा झाली असून केलेल्या तपासण्यामधून तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याचे आढळून आले आहे. अजूनही तिची स्थिती गंभीर असल्याचे शीव रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. जयश्री मोंडकर यांनी सांगितले. या घटनेपाठोपाठ सकाळी ११ च्या सुमारास विक्रोळी पश्चिमेला राहणारी ज्योती वर्मा हिचा रूळ ओलांडताना लोकलच्या धडकेत मृत्यू झाला, कुल्र्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव यांनी ही माहिती दिली. ज्योती ही विद्याविहार येथे सोमय्या महाविद्यालयात ११ व्या इयत्तेत वाणिज्य शाखेत शिकते.

योग्यवेळी मदत मिळाली असती तर..

साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. त्यानंतर जवळपास तासभर तरी तेजश्री गटारामध्ये पडून मदत मागत होती. अपघातानंतर लगेचच रेल्वे पोलिसांकडून तिला मदत मिळाली असती तर कदाचित तिच्यावर लवकर उपचार सुरू झाले असते, असे तेजश्रीची आई आशा वैद्य यांनी सांगितले. दादर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बोबडे यांनी मात्र तेजश्रीला योग्यवेळी मदत आणि उपचार दिल्याचे सांगितले.