शरद पवारांचा नेत्यांना सल्ला; पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न

आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पक्षाने ७० टक्के उमेदवार हे वयोगट तिशीच्या आतील उभे करावेत म्हणजे त्याचा पक्षाला निश्चितच फायदा होईल. यासाठी आतापासूनच तरुण नवे चेहरे शोधण्यास सुरुवात करा, असा सल्ला राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी नेतेमंडळींना दिला.

आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाचे नेते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत बोलताना पवार यांनी तरुण रक्ताला वाव देण्यावर भर दिला. १९९९ मध्ये पक्ष स्थापनेनंतर सत्तेत तरुणांना संधी दिली होती. त्यातून आर. आर. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांचे नेतृत्व पुढे आले. (पक्षाच्या प्रसिद्धिपत्रकात तरुण मंत्र्यांमध्ये अजित पवार यांचा मात्र उल्लेख करण्यात आलेला नाही). राष्ट्रवादीचे मंत्री म्हणजे काम करणारे मंत्री, असे चित्र तेव्हा होते याकडे पवार यांनी लक्ष वेधले. या पाश्र्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तरुणांना संधी दिल्यास त्याचा पक्षाला फायदाच होईल. राष्ट्रवादी म्हणजे तरुणांचा पक्ष हा संदेश महत्त्वाचा ठरणार आहे. यासाठी आतापासूनच नवे चेहरे शोधण्यास सुरुवात करा, अशी सूचना पवार यांनी केली.

राष्ट्रवादीबद्दल होणारा संशय दूर झाला पाहिजे, अशी अपेक्षा प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीबरोबर आघाडी करणार किंवा बरोबर जाणार या चर्चेने पक्षाचे नुकसान होते. पक्ष अधिक बळकट करावा, असे मतही त्यांनी मांडले. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचे महत्त्व कमी करण्याच्या उद्देशानेच राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा देण्याची चाल केली होती, असा दावा त्यांनी केला.

आगामी निवडणुका सर्वत्र पक्षचिन्हावर लढवाव्या, अशी सूचना अजित पवार यांनी केली. पालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी गत वेळेप्रमाणेच पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून कायम राहावा, अशी अपेक्षा  सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.