01 March 2021

News Flash

‘येस’ बँकेप्रमाणेच पंजाब व महाराष्ट्र बँकेच्याही ठेवीदारांना दिलासा द्या – नाना पटोले

मालमत्ता विक्रीतून निधी उभारुन बँकेच्या क्रियान्वयनास चालना देण्याचीही सूचना केली.

संग्रहीत छायाचित्र

पंजाब व महाराष्ट्र को. ऑप बँकेच्या ९ लाख ठेवीदारांना, खातेदारांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने येस बँक अडचणीत आल्यानंतर ज्याप्रमाणे प्रस्ताव तयार करत कार्यवाही केली, त्याचप्रमाणे या प्रकरणातही प्रस्ताव तयार करण्यात यावा. बँकेवर नेमण्यात आलेले प्रशासक, आर्बिट्रेटर आणि आरबीआय यांनी तातडीने पावले उचलत मालमत्ता विक्रीतून निधी उभारुन बँकेच्या क्रियान्वयनास चालना द्यावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या आहेत.

यावेळी नाना पटोले यांनी सांगितले की, आरबीआयने ९ लाख ठेवीदार खातेदारांचे हित डोळ्यासमोर ठेवून येस बँकेच्या धर्तीवर प्रस्ताव तयार करावा. आयुष्यभराची पुंजी बँकेत ठेवली, बँक बुडाल्याने मानसिक धक्का बसून, तसेच खचून काहींचा मृत्यू झाला आहे. तसेच, ठेवीदारांच्या हितासाठी आरबीआय काय कार्यवाही करीत आहे? त्यासंदर्भात दर १५ दिवसांनी सद्य:स्थितीचा अहवाल वेबसाईटवर प्रदर्शित केला जावा आणि त्याद्वारे ठेवीदारांना माहिती उपलब्ध व्हावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

पंजाब व महाराष्ट्र को. ऑप बँक ठेवीदार, खातेदारांच्या समस्यांबाबत आज (२७ ऑक्टोबर) रोजी विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

यावेळी माजी विधानपरिषद सदस्य आणि काँग्रेस नेते चरणसिंह सप्रा, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ल, अप्पर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह, सह आयुक्त अनिल कवडे, उपसचिव गृह विभाग रमेश मनाळे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अभिनव पुष्प, सीए विजय मुंगळे, ठेवीदार संघर्ष कृती समितीचे निखिल व्होरा, सिद्धेश पांडे व इतर उपस्थित होते.

चरणसिंग सप्रा व अडचणीत सापडलेल्या बँक खातेदारांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानूसार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली या अगोदर दिनांक ३० जुलै, २०२० रोजी बैठक घेण्यात आली होती. बैठकीत खातेदारांनी आणि ठेवीदारांनी आपल्या समस्या मांडल्या होत्या. अनेक ठेवीदार, खातेदार हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांना दैनंदिन खर्चासाठी तसेच गंभीर आजार झालेल्या ठेवीदार, खातेदार यांना उपचार खर्चासाठी रक्कम देण्याबाबत बँकेवरील प्रशासकाने योग्य मार्ग काढावेत अशा सूचना या बैठकीत विधानसभा अध्यक्ष यांनी दिल्या होत्या. या आदेशानुसार अनेक ठेवीदारांना मदत देण्यात आली असून, याबद्दल ठेवीदारांनी नाना पटोले यांचे आजच्या बैठकीत आभार मानले.

पीएमसी बँकेचे अनेक मोठे व्यवहार बँकेच्या रेकॉर्डवर नव्हते –
पीएमसी बँकेचे अनेक मोठे व्यवहार बँकेच्या रेकॉर्डवर नोंदविलेच जात नव्हते, अशी धक्कादायक कबुली यावेळी आरबीआयचे अभिनव पुष्प यांनी या बैठकीत दिली. आरबीआयचे अधिकारी सेवानिवृत्तीनंतर पीएमसी बँकेत मोठ्या पगाराच्या पदावर नेमले गेले. बॅंक आतून पोखरली जात आहे, मोठी कर्ज प्रकरणे संशयास्पद आहेत, याची माहिती असतांनाही बँकेला ऑडिट “अ” वर्ग दिला गेला जेणेकरुन अधिकाधिक ठेवीदारांना आकृष्ट करता येईल. अशा संगनमतामुळेच ठेवीदार आर्थिक संकटात लोटले गेले, अशी व्यथा यावेळी ठेवीदार प्रतिनिधींनी मांडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 8:48 pm

Web Title: give relief to the depositors of punjab and maharashtra bank just like yes bank nana patole msr 87
Next Stories
1 योग्य खबरदारी घेतल्याने मुंबईचा करोना नियंत्रणात!
2 मराठा आरक्षण : अशोक चव्हाण यांनी उपसमितीचा राजीनामा द्यावा – मेटे
3 ड्रोनद्वारे मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता, पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय
Just Now!
X