मुंबईतही चतुरांच्या साठहून अधिक जाती आहेत. मात्र सध्या मुंबईकरांना झाडांच्या शेंडय़ांवर दिसत असलेले चतुर विशेष आहेत. वॉण्डरिंग ग्लायडर (शास्त्रीय नाव – पॅण्टाला फ्लॅविसीन्स) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चतुरांचे दक्षिण आफ्रिका ते भारत यामध्ये स्थलांतर सुरू असते. सध्या मुंबईत मोठय़ा संख्येने हे चतुर िपगा घालताना दिसत आहेत. आज, रविवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात या चतुरांचा शोध-अभ्यास करण्यात येणार आहे.
‘स्प्राऊट्स’ या पर्यावरणविषयक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि वन्यजीवविषयक तज्ज्ञ आनंद पेंढारकर यांनी ही माहिती देताना सांगितले की, मुंबईत आतापर्यंत आम्हाला ५० प्रकारचे चतुर दिसले असून शहरापेक्षा जंगलात अधिक जाती आढळण्याची शक्यता आहे.
ते म्हणाले की, आयुष्याचा सर्वाधिक काळ हा प्रवासातच जात असल्याने या चतुरांची मूळ जागा आफ्रिका की भारत हे निश्चित करणे कठीण आहे. मात्र लक्षद्वीप बेटांचा आसरा घेत ६५ हजार किलोमीटर प्रवास करताना चतुरांची चौथी पिढी मूळ जागी पोहोचते.
आफ्रिकेतून लक्षद्वीपचा टप्पा घेत प्रजनन होते, त्यानंतर भारतातील किनारपट्टीवर प्रजनन होते, आफ्रिकेत परत जातानाही याच पद्धतीने ते लक्षद्वीपवर पुन्हा थांबा घेतात. पावसाळा संपल्यावर कीटकांच्या जगतात मोठय़ा प्रमाणावर घडामोडी सुरू होतात, प्रजनन झाल्याने संख्या वाढलेली असते. त्यामुळे त्यांचे अस्तित्व अधिक जाणवते, असे फुलपाखरू अभ्यासक आयझ्ॉक किहीमकर यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 11, 2015 5:12 am