मुंबईतील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोन्याच्या बिस्कीटांची स्मगलिंग करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ६.७३ किलो वजनाची दोन कोटी रुपये किंमतीची सोन्याची बिस्कीटे हॉटेलच्या रुममधून जप्त केली.
पोलिसांनी महसूल गुप्तचर संचलनालयाला याची माहिती दिली असून त्यांनी चौकशी सुरु केली आहे असे सूत्रांनी सांगितले. काही जण स्मगलिंगची सोन्याची बिस्कीटे विकण्यासाठी बोरीवली येथे येणार असल्याची पोलिसांना टीप मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला व कारमधून आलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले.
कारची झडती घेतली असता १०० ग्रॅम वजनाची सोन्याची दोन बिस्कीटे आणि २१ लाख रुपये सापडले असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निसार तांबोळी यांनी सांगितले. मेहबूब शेख (३९), साजिया शेख (३७), जाफर खान (४६), मोहम्मद शेख (३०) आणि तब्बसूम खान (२७) या पाच जणांना अटक केली आहे. आरोपींच्या चौकशीत ६.७३ किलो वजनाची सोन्याची ५५ बिस्कीटे हॉटेलच्या रुममध्ये असल्याचे समजले.
पोलिसांनी रुमची झडती घेऊन हा सर्व माल जप्त केला. सोन्याच्या या स्मगलिंगसाठी झोपडपट्टीतील महिलांचा वापर केला जायचा. त्यांना दुबईला पाठवले जायचे. तिथे गेल्यावर पिशव्या आणि पट्ट्यामध्ये दडवून सोने पाठवले जायचे. महिला विमानतळावरच्या पार्कीग भागात संबंधित व्यक्तीला भेटल्यानंतर त्यांच्याकडे हे सोने सुपूर्द केले जायचे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2018 10:07 pm