सांस्कृतिक आणि संस्कृती परंपरेला सोनेरी क्षणांत उजळून टाकणारा सण म्हणून दसऱ्याला विशेष महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तापकी एक मानल्या जाणाऱ्या या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र यंदा महागाईने डोकं वर काढल्याने खरं सोनं खरेदी करण्यापेक्षा स्वस्तात आणि ‘बजेट’मध्ये उपलब्ध होणाऱ्या एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसत आहे. ६०० रुपयांपासून अगदी साडेपाच हजार रुपयांपर्यंत हे दागिने बाजारात उपलब्ध आहेत. यात दसऱ्याच्या मुहूर्तावर व्यापाऱ्यांनी सर्व दागिन्यांवर ३० ते ४० टक्के सवलत दिल्याने मुंबईतील अनेक दुकानांत गर्दी पाहायला मिळत आहे.
शहर व उपनगरातील दादर, वांद्रा, गिरगाव, चिराबाजार, काळबादेवी, मशीद बंदर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव आदी भागांत एक ग्रॅम सोन्याचा मोठा व्यापार आहे. इथे छोटय़ात छोटय़ा अंगठीपासून मोठय़ात मोठे हार मिळतात. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात या दुकानांत मूर्तीच्या सजावटीसाठीही अनेक छोटी-मोठी मंडळे एक ग्रॅम सोन्याचे दागिने विकत घेत असतात. आता नवरात्रीपाठोपाठ येणारा दसरा हा सण महिलावर्गासाठी सोन्याच्या वरून खरेदीसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. तर नववधूंनाही या सणाची आगळीकता विशेष असते. परंतु यंदा महागाईचे गणित सोडवताना आधीच सर्वसामान्यांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे खरं सोनं खरेदीपेक्षा एक ग्रॅम सोनं बजेटमध्ये बसत असल्याचे महिलावर्गाकडून सांगण्यात येत आहे.
दसऱ्याला सोनं खरेदी करण्याची आपली परंपरा पुढे चालत राहावी यासाठी यंदा एक ग्रॅम सोनं खरेदी करत असल्याचे कांदिवलीच्या नेहा सोहनी या गृहिणीने सांगितले. याशिवाय सध्या या परिसरात सोन साखळी खेचण्याचे प्रकार बळावत आहेत. त्यामुळे एक ग्रॅम सोनं सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही चांगले असे सोहनी म्हणाल्या. दसऱ्यात सोनं खरेदी करणे ही आपली परंपरा आहे. त्यामुळे ज्यांना खरं सोनं परवडत नाही असे ग्राहक एक ग्रॅम सोनं खरेदी करतात. त्यामुळे खऱ्या सोन्याप्रमाणेच कल्पक आकाराचे दागिने आम्ही त्यांना बनवून देत असतो. यंदा गळ्यातली साखळी, मंगळसूत्र आणि कर्णफुल विकत घेण्याकडे ग्राहकाचा कल आहे. या पाश्र्वभूमीवर दसऱ्याच्या मुहूर्तावर चार दिवस सर्व दागिन्यांवर ४० टक्के सूट दिली असल्याचे मालाडचे व्यापारी दीपक धानक यांनी सांगितले.