News Flash

तलावातील पाणीसाठा समाधानकारक

शहराची वर्षभराची पाण्याची गरज लक्षात घेता तलावातील पाणीसाठा पुरेसा नाही

शहराची वर्षभराची पाण्याची गरज लक्षात घेता तलावातील पाणीसाठा पुरेसा नाही असे पालिकेकडून सांगण्यात येत असले तरी गेल्या सात वर्षांमधील जुलैच्या पहिल्या आठवडय़ातील पाणीसाठय़ाच्या तुलनेत यावर्षी पावसाने चांगली कामगिरी केली आहे. सात वर्षांतील हा तिसऱ्या क्रमांकाचा पाणीसाठा असून इतर चार वर्षांत जुलैच्या पहिल्या आठवडय़ाअखेरीस तलावातील पाणीसाठा केवळ एक लाख दशलक्ष लिटपर्यंतच पोहोचला होता. यावर्षी आतापर्यंत तब्बल २ लाख ७६ हजार दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे.

यावर्षी ठाणे व नाशिक पट्टय़ात जुलैच्या पहिल्या आठवडय़ात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मात्र गेल्या आठवडय़ात पडलेल्या पावसाने तलावातील पाणीसाठा लक्षणीयरीत्या वाढला आहे. गेल्या सात वर्षांतील आकडेवारीची तुलना करता हा पाणीसाठा तिसऱ्या क्रमांकाचा असून गेल्यावर्षीचा अपवाद वगळता इतर सर्व वर्षांत ३० सप्टेंबर रोजी तलाव पूर्ण क्षमतेने भरली होती.

गेल्या वर्षी जूनमध्ये विक्रमी पाऊस पडल्याने तलावातील पाणीसाठा वाढला होता, तर २०१४ मध्ये जुलैच्या अखेरच्या आठवडय़ात पावसाने संततधार ठेवल्याने पावसाळाअखेरीस तलाव पूर्ण (१४ लाख ११ हजार दशलक्ष लिटर) भरले होते. २०१३ या वर्षांचा अपवाद वगळता इतर वर्षांमध्ये ८ जुलैपर्यंत तलावात सरासरी १ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा असल्याचे दिसते.

मुंबईसाठी सात तलावांमधून पाणीसाठा केला जातो. त्यातील तुळशी व विहार ही दोन लहान तळी शहरातच असून इतर पाच तलाव ठाणे व नाशिक जिल्ह्य़ात आहेत.

मुंबईला दररोज सुमारे ३,७०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असून वर्षभराच्या पाणीपुरवठय़ासाठी सप्टेंबरअखेरीस तलावात १३ लाख ५० हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जरुरीचा असतो. २०१३ पासून मध्य वैतरणा हे धरण अंशत: व २०१४ पासून पूर्णत: उपलब्ध झाले. त्यामुळे तलावांच्या क्षमतेत वाढ होऊन तब्बल १४ लाख दशलक्ष लिटपर्यंतचा पाणीसाठा जमा होऊ लागला. गेल्यावर्षीचा अपवाद वगळता सप्टेंबरअखेरीस मुंबईचे तलाव पूर्ण भरत असल्याचा अनुभव आहे.

आठ जुलैपर्यंत पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

  • २०१६ – २ लाख ७६ हजार ८६८
  • २०१५ – ३ लाख ११ हजार २१२
  • २०१४ – ९७ हजार ८४२
  • २०१३ – ५ लाख ८५ हजार ०५०
  • २०१२ – १ लाख १९ हजार ०६६
  • २०११ – १ लाख १९ हजार ८०३
  • २०१० – १ लाख ०९ हजार ८६४

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2016 3:01 am

Web Title: good rainfall in mumbai
Next Stories
1 ‘मागास’ स्मार्टफोनमधून व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक हद्दपार!
2 पालिकेच्या सत्तेपासून आम्हाला कोण रोखणार – मुख्यमंत्री
3 औषधी वनस्पतींच्या संशोधनाचा ‘आयुष’ प्रकल्प अधांतरीच!
Just Now!
X