अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद; आरोग्य कर्मचारी मात्र अजूनही उदासीन

मुंबई : करोना प्रतिबंधासाठी देशभर राबवण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेला आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांकडून अजूनही अल्प प्रतिसाद असला तरी, पोलीस तसेच अन्य अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी लस घेण्याबाबत अनुकूल असल्याचे दिसत आहे. मुंबईत सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू असून या केंद्रांवरील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांसह पोलीस, बस चालक-वाहक, सफाई कामगार, पालिका कर्मचारी अशा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून सुरू झाले. परिणामी, लस घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या तीन दिवसांत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा लसीकरणासाठी जवळपास दुपटीहून अधिक प्रतिसाद वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे पंधरा दिवसांतच जवळपास ५० हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे तर आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू होऊन अजून १ लाखाचा टप्पाही पार केलेला नाही.

कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर बहुतांशी बेस्ट कर्मचारी दिसून आले. प्रतीक्षानगर, आणिक आगर, कुर्ला आगार ही महत्त्वाची आगारे नजीक असल्याने इथे बेस्ट कर्मचारी अधिक होते. ‘लसीकरणानंतर काहींना ताप येतो हे आम्हाला माहीत आहे. पण कोणतीही लस घेतल्यावर त्याचे थोडे परिणाम होणारच. तशी मानसिक तयारी करून आम्ही आलो आहोत,’ अशी प्रतिक्रिया लसीकरणासाठी आलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिली.

शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात पालिका कर्मचारी अधिक होते. धारावी, चुनाभट्टी, माटुंगा परिसरातील पालिकेचे कर्मचारी लस घेण्यास आले होते. यात पोलीस आणि वाहतूक पोलीसही मोठय़ा प्रमाणात होते.

प्रत्येक कर्मचाऱ्याची त्याच्या विभागामार्फत नोंदणी केली जाते व लसीकरण केंद्रांवर आधार कार्ड किंवा कर्मचारी क्रमांक पाहून त्यांना प्रवेश दिला जातो. लसीकरण केल्यानंतर संबंधित व्यक्तीला अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवले जात आहे.  लसीकरण झाल्यानंतरही त्यांच्या नावांची नोंद करून घेतली जाते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी शताब्दी रुग्णालयात लांबलचक रांग लागली होती.

लसीकरणाची सद्य:स्थिती

’ १६ फेब्रुवारी आरोग्य कर्मचारी                १४६६

अत्यावश्यक  कर्मचारी                              ४५३७

’ १७ फेब्रुवारी  आरोग्य कर्मचारी                  १३७४

अत्यावश्यक कर्मचारी                               ६६३३

’ १८ फेब्रुवारी आरोग्य कर्मचारी                २३६२

अत्यावश्यक कर्मचारी                            १००९७

जेजेमध्ये शुकशुकाट

जेजे रुग्णालयात शुक्रवारी लसीकरण केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळाला. सकाळ ते दुपारच्या सत्रात अत्यल्प प्रतिसाद होता. ‘शिवजयंतीची शासकीय सुट्टी असल्याने लसीकरण केंद्रही बंद असेल असे लोकांनी ग्राह्य़ धरले असावे. अन्यथा कालपासून प्रतिसाद वाढला आहे. ‘बी’ विभागातील पालिका कर्मचारीही कालपासून येऊ लागले आहेत,’ असे केंद्रावरील डॉक्टरांनी सांगितले.