घरच्या घरी व्हिडीओ अ‍ॅपद्वारे छायाचित्रण

मुंबई : टाळेबंदीमुळे पुरस्कार सोहळे, स्टुडियो बंद असले तरीही  छायाचित्रकार ‘गुगल डय़ुयो’, ‘स्काईप’, ‘फेसटाईम’, ‘झूम’ यासारख्या अ‍ॅपचा वापर करत ऑनलाइन छायाचित्रण करत आहे.  घरीच मर्यादित साधनांसह केल्या जाणाऱ्या या ऑनलाईन छायाचित्रणास कलाकार आणि ग्राहकांचाही प्रतिसाद लाभत आहे.

टाळेबंदीच्या शिथिलीकरणानंतरही करोनाच्या धास्तीपायी कलाकार, मॉडेल्स छायाचित्रणास कचरत आहेत. यावर उपाय म्हणून छायाचित्रकारानी ऑनलाईन छायाचित्रणाचा उपाय शोधला आहे. यात ‘गुगल डय़ुयो’, ‘फेसटाईम’, ‘झूम’, ‘स्काईप’ यासारख्या व्हीडीओ कॉलिंग अ‍ॅपचा उपयोग केला जातो. हे अ‍ॅप सुरू करून विशिष्ट ‘पोझ’ देऊन छायाचित्रे काढली जातात. घरी लेन्स, लाईट ही उपकरणे नसल्याने मर्यादित साधनांसोबत छायाचित्रण करणे आव्हानात्मक असल्याचे मत अनेक छायाचित्रकारांनी व्यक्त केले. याकरिता नैसर्गिक प्रकाशाचा वापर के ला जातो. छायाचित्रकार तेजस नेरुरकर यांनी टाळेबंदीत ‘फोन २ फोन फोटोग्राफी’ या मालिकेतर्ंगत सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, सचिन पिळगावकर, महेश काळे यासह अनेक लोकप्रिय व्यक्तीची ऑनलाइन छायाचित्रे काढली. सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींना घेऊन स्वदेशी पोशाखाचे महत्व सांगणारी त्यांची छायाचित्रांची मालिकाही समाजमाध्यमावर चांगलीच गाजत आहे. याबद्दल तेजस नेरुरकर यांनी सांगितले की, समाजात सकारात्मकता निर्माण करण्यासाठी छायाचित्रांची मालिका केली.

छायाचित्रकार प्रथमेश रांगोळे याने टाळेबंदीत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे-स्वप्नील राव, अभिनेता आरोह-अंकिता वेलणकर, संगीतकार रोहन गोखले-प्रिया यांची छायाचित्रे टिपली आहेत. ‘घरी असल्याने ऑनलाइन छायाचित्रण करण्याचे ठरवले. अशा प्रकारचे छायाचित्रण करताना उपकरणे, प्रकाशयोजनेचा ताळमेळ जमवावा लागतो. या प्रकारच्या छायाचित्रांना थोडय़ाफार संकलनाची गरज भासते,’ असे रांगोळे यांनी सांगितले. ऑनलाइन छायाचित्रे टिपताना इंटरनेटचा वेग मोलाची भूमिका बजावतो. ज्यांची छायाचित्रे काढायची आहेत त्यांचे घर, प्रकाशयोजना याही गोष्टी पहाव्या लागतात. यासाठी मॉडेल अथवा ग्राहकाच्या लॅपटॉपवर स्क्रीनशॉट घेऊन नंतर एडिट केले जातात. टाळेबंदीच्या काळात ऑनलाइन प्रकारच्या छायाचित्रणास मोठय़ा प्रमाणावर मागणी असल्याचे छायाचित्रकार रोहन तुळपुळे याने सांगितले.

ऑनलाइन छायाचित्रण आव्हानात्मक

ऑनलाइन पध्दतीचे छायाचित्रण कितीही चांगले असले तरीही त्या छायाचित्रांचा छापील दर्जा चांगला नसतो. यात एडिट करण्यासही तेवढेच कसब लागते. इंटरनेटला वेग नसेल तर छायचित्रणास अडचणी येतात. फ्रेम, प्रकाशयोजना यासारख्या तांत्रिक बाबीही बारकाईने पहाव्या लागतात.