१०१व्या जयंतीनिमित्त ‘डूडल’मध्ये चित्राकृती

मुंबई : साहित्य आणि कला क्षेत्रातील दिग्गज पु. ल. देशपांडे यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त गूगलने डूडलच्या माध्यमातून त्यांना मानवंदना दिली.  संवादिनीवर हात ठेवून बसलेल्या पुलंची ही सांगीतिक मुद्रेतील चित्राकृती मुंबईतील समीर कुलावूर या कलाकाराने साकारली आहे.

साहित्य, चित्रपट, संगीत, अभिनय, नाटक, समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत ठसा उमटवणारे हरहुन्नरी पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, म्हणजे सर्वाचे लाडके पुलं यांची १०१वी जयंती रविवारी झाली. माहितीचे जागतिक व्यासपीठ असलेल्या गूगलने देखील पुलंच्या कार्याची दखल घेत त्यांना डूडलच्या माध्यमातून अभिवादन केले.

पुलं आणि संगीत या अविभाज्य समीकरणाला साजेशी चित्रकृती यानिमित्ताने साकारण्यात आली होती.  संवादिनीवादन करत गाण्यात मग्न असलेले पुलं आणि मागे आनंदयात्री या विशेषणाला साजेशी अशी रंगरचना या चित्रकृतीत करण्यात आली होती.

८ नोव्हेंबर १९१९ हा पुलंचा जन्मदिवस. त्यांचे लेखन रसिकांना भुरळ घालणारे असले तरी त्यापलीकडे नाटक, गीत, संगीत, कथा, अभिनय, दिग्दर्शन अशा नाना कलांमध्ये ते पारंगत होते.  हजरजबाबीपणा, विनोदबुद्धी, भाषेवर प्रभुत्व ही त्यांची खास ओळख. याच त्यांच्या जीवनपटाचा जयंतीनिमित्त ‘गूगल आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर’ विभागाने वेध घेतला आहे. तसेच या विभागात पुलंविषयीचे खास दालन करण्यात आले आहे.