अभिनेता संजय दत्तच्या शिक्षेबाबत कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालेलं नाही. जेलमध्ये संजय दत्तला नेमून दिलेली कामं त्यानं पूर्ण केली आहेत. तुरुंगातल्या चांगल्या वर्तणुकीमुळे त्याची सुटका शिक्षा कमी करण्यात आली होती, अशी माहिती राज्य सरकारनं हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. त्यामुळे संजय दत्तची डोकेदुखी दूर झाल्यात जमा आहे.

असं असलं तरीही राज्य सरकारनं हायकोर्टात दिलेल्या या स्पष्टीकरणाला सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी विरोध केला आहे. नेमकी कोणती चांगली कामं संजय दत्तनं तुरुंगात शिक्षा भोगताना केली? नेमकी काय चांगली वर्तणूक होती? ज्यामुळे संजय दत्तची शिक्षा कमी झाली असे प्रश्न भालेकर यांनी उपस्थित केले आहेत.

१२ जून रोजी मुंबई हायकोर्टानं संजय दत्तच्या शिक्षेप्रकरणी राज्य सरकारला प्रश्न विचारत संजूबाबाची डोकेदुखी वाढवली होती. संजय दत्तला शिक्षा पूर्ण व्हायच्या ८ महिने आधी का सोडलं? संजय दत्त पॅरोलवर अनेकदा बाहेर होता मग त्याची चांगली वर्तणूक पोलिसांना कशी समजली? महाराष्ट्र कारागृह विभागासोबत संजय दत्तच्या सुटकेसंदर्भात चर्चा झाली होती का? असे प्रश्न उफस्थित करण्यात आले होते. तसंच राज्य सरकारनं याबाबत लवकरात लवकर स्पष्टीकरण द्यावं असंही कोर्टानं म्हटलं होतं.

पुण्यात वास्तव्य करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी यासंदर्भातली याचिका दाखल केली होती. या सगळ्या प्रकरणी कोर्टानं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितल्यानं संजय दत्तच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र कोर्टात राज्य सरकारनं संजय दत्तची बाजू मांडल्यानं त्याच्या अडचणी कमी होणार यात शंका नाही.

आर्म अॅक्ट अंतर्गत मला शिक्षा झाली होती, बॉम्बस्फोट प्रकरणात नाही अशी प्रतिक्रिया संजय दत्तने सुटकेनंतर दिली होती. कोर्टानं जेव्हा हे म्हटलं की, तू दहशतवादी नाहीस तेव्हा मला सगळ्यात मोठा दिलासा मिळाला. माझे वडील हयात असेपर्यंत हे ऐकण्यासाठी आतूर होते. आता यापुढे कृपा करून माझे नाव बॉम्बस्फोट प्रकरणाशी जोडू नका, अशी विनंतीही संजय दत्तने सुटकेनंतर सगळ्या प्रसारमाध्यमांना केली होती. आता कोर्टानं विचारलेल्या स्पष्टीकरणाला राज्य सरकारनं संजय दत्तच्या बाजूनं उत्तर दिलं आहे. त्यामुळे संजय दत्तचं टेन्शन कमी झालं आहे असं म्हणायला हरकत नाही.