केंद्रातील सरकार वर्षपूर्तीनिमित्त ‘जनकल्याण पर्व’ दणक्यात साजरे करणार असतानाच सामान्यांना मात्र महागाईचे चटके वाढत्या प्रमाणात सोसावे लागणार आहेत. मुंबईकरांवर तर पेट्रोल-डिझेल, दूध आणि मालमत्ता कर अशी महागाईची तिहेरी कुऱ्हाड कोसळणार आहे.

पेट्रोल, डिझेल पुन्हा महागले

पेट्रोल-डिझेलचा दर मुंबईत लिटरमागे अनुक्रमे ३ रुपये २८ आणि २ रुपये ९९ पैशांनी वाढला आहे. या दरवाढीआधीच रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ जाहीर झाली असली आणि नवे भाडेदर १ जूनपासून अमलात येणार असले तरी रिक्षा-टॅक्सी संघटना पुन्हा भाडेवाढीची मागणी रेटतील, अशीही टांगती तलवार मुंबईकरांच्या माथी आहेच.

डाळींचे दर कडाडले; वायदे बाजार सुरू झाल्याचा परिणाम

पिशवीबंद दुधाच्या छापील किमतीपेक्षा जास्त दर आकारणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवर अंकुश लावून दररोज निर्माण होणारा काळ्या पैशांचा कोटय़वधींचा व्यवहार रोखण्यासाठी वैधमापन खात्याने केलेल्या कारवाईमुळे मुंबईकरांनी दिलाशाचा नि:श्वास सोडला होता. मात्र, दूध विक्रेत्यांनी कमिशनवाढीची मागणी करीत दूध विक्रीच रोखण्याचा पवित्रा घेतल्यानंतर दूध संघांनी आता थेट दरवाढ करीत विक्रेत्यांना दिलासा दिला आहे. महानंद या शासकीय दुग्धशाळेनेच यासाठी पहिले पाऊल उचलले असून दुधाचे दर लिटरमागे दोन रुपयांनी वाढविले आहेत. सध्या दुधाच्या पिशवीवर ३८ रुपये असाच छापील दर असला, तरी नव्या दरानुसार लिटरमागे ४० रुपये आकारण्याची मुभा महानंदने वितरकांना दिली आहे.

मालमत्ता करावर परिवहन उपकर लावण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या बैठकीत मंजूर झाला. आता हा प्रस्ताव आधी मुंबई महापालिकेकडे आणि त्यानंतर राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. तो मंजूर झाला तर एप्रिल २०१६पासून परिवहन अधिभारापायी मालमत्ता कराचा बोजाही दहा टक्क्य़ांनी वाढणार आहे.

पेट्रोल डिझेलचे दर वाढताच अन्नधान्य व भाज्यांचे भाव वाढवले गेले होते. मात्र इंधनाचे दर कमी होत गेले तरीही अन्नधान्य व भाज्यांचे भाव एकदाही कमी केले गेले नाहीत. आता इंधन दरवाढीचे कारण देत पुन्हा अन्नधान्य व भाज्यांचे भाव कडाडणार असल्याने सामान्यांचाच खिसा कापला जाणार आहे.