कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’चा निर्णय

मुंबई : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या आवाहनाला खासगी क्षेत्रानेही प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार कंपन्यांच्या ‘बैठका व्हर्चुअली’ घेतानाच ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यपद्धती अवलंबण्याचे कंपन्यांनी मान्य केले आहे. तसेच औषधे, मास्क, सॅनिटायझर, व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याची तयारीही या कंपन्यांनी दाखविल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी सह्य़ाद्री अतिथिगृह येथे उद्योजकांशी संवाद साधला. या वेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त अनुपकुमार यादव यांच्यासह औषधे, बँका, संस्थांचे व्यवस्थापन प्रमुख आणि आरोग्य क्षेत्रातले तज्ज्ञ उपस्थित होते. करोनाचा संसर्ग टाळण्याकरिता गर्दी कमी करणे हा प्रभावी उपाय आहे. खासगी कंपन्यांमार्फत कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पनेनुसार परवानगी देण्यात आली आहे.

कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) करोनाच्या उपाययोजनांसाठी मास्क, सॅनेटाझर्स, पीपीई कीट, व्हेंटिलेटर्स, शासनासाठी उपलब्ध करून देण्याची या वेळी मान्य केले. रुग्णांच्या विलगीकरणासाठी सुविधादेखील उपलब्ध करून देण्याबाबत या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी तयारी दर्शविली. जी औषधे अत्यावश्यक आहेत, ती देखील औषध कंपन्यांकडून मोफत उपलब्ध करून देण्याचे मान्य केल्याचे, आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवा वगळून अन्य सेवा, आस्थापना, कार्यालये बंद करण्याबाबत शिफारस यावेळी या कंपन्यांनी केल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.

करोनाच्या जाणीव जागृतीसाठी खासगी कंपन्यांनी तयारी दर्शविली असून, सीएसआरच्या माध्यमातून विविध माध्यमांचा उपयोग करण्यात येईल, असे या वेळी सांगण्यात आले. ज्यांचा रोजदांरीवर उदरनिर्वाह आहे, त्यांच्यासाठी काही विशेष सोय करण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची लवकरच मुभा 

राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत घरून काम करण्याची मुभा देण्याचा विचार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

विद्यापीठे, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आपत्कालीन परिस्थिती वगळता प्राध्यापकांना घरून काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) परवानगी देण्यात आली आहे. याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही परिस्थितीनुसार अशी परवानगी देण्याबाबत शासन निर्णय घेईल.विद्यापीठे, महाविद्यालये बंद असली, तरी विद्यापीठाचे कुलगुरू, उपकुलगुरू, कुलसचिव, उपकुलसचिव तसेच महाविद्यालये/तंत्रनिकेतनचे प्राचार्य/संचालक/अधिष्ठाता, यांनी नियमितरीत्या कार्यालयात हजर राहणे आवश्यक असल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे असते. आवश्यकतेनुसार प्राध्यापकांप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही घरून काम करण्याची मुभा देण्यात येईल.