पानसरे, दाभोलकर हत्याकांडप्रकरणी विशेष तपास पथक गोव्यातील आश्रमात

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांडाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने(एसआयटी) गेल्या दोन दिवसांपासून गोव्यातील सनातन संस्थेच्या रामनाथी आश्रमात तळ ठोकला आहे. या दोन दिवसात एसआयटीतील अधिकाऱ्यांनी संस्थेचे विश्वस्त वीरेंद्र मराठे यांच्याकडे कॉ. पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांडाबाबत चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. याचवेळी पथकाकडून संस्थेचे प्रमुख जयंत आठवले यांचीही चौकशी झाली, असे कळते. तर, सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी, एटीएसच्या पथकाने आश्रमातील काही जणांशी चर्चा केली, असे सांगितले.

फोंडा येथे हा आश्रम असून स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारपासून एसआयटीची आश्रम परिसरात वर्दळ होती. मंगळवारी पथक आश्रमात होते. बुधवारी या पथकाने फोंडा पोलीस ठाणे गाठून तेथील कुमक घेऊन आश्रम गाठले. त्यासोबत गावात राहाणाऱ्या साधकांचीही एसआयटीने चौकशी केल्याची माहिती आहे. राज्याचे महासंचालक सतीश माथूर यांच्यासह एसआयटी प्रमुख संजय कुमार यांनी या कारवाईविषयी बोलणे टाळले. तर सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी मात्र दोन दिवसांपासून एसआयटी पथक रामनाथी आश्रमात होते, या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र  पथकाने मराठे यांच्याशी चर्चा केल्याचे वर्तक यांनी सांगितले. गेल्यावर्षी फेब्रुवारीत डॉ. दाभोलकर हत्येचा तपास करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने आठवले व मराठे यांच्याकडे चौकशी केली होती. मात्र दोघांकडूनही दाभोलकर हत्याकांडाशी संबंधित फारशी माहिती मिळाली नव्हती, असे समजते.

मडगांव बॉम्बस्फोटात सनातन साधकांचा सहभाग उघड झाल्यापासून रामनाथी आश्रम गोवा पोलिसांसह देशभरातल्या तपास यंत्रणांच्या रडारवर आला . तेव्हापासून प्रत्येक घटना, घडामोडीनंतर, विविध घटनांच्या तपासासाठी येथे पोलीस पथकांची ये-जा सुरू झाली. या व्यतिरिक्त सनातन संस्थेने दाभोलकर यांच्याविरोधात तब्बल १८ अब्रुनुकसानीचे दावे दाखल केले होते. डॉ. दाभोलकर यांनी हाती घेतलेल्या अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कार्याला सनातनकडून प्रखर विरोध होत होता. त्यातून हे हत्याकांड घडल्याचा दावा सीबीआयने केला आहे. यासोबत कॉ. पानसरे आणि विचारवंत एमएम कलबुर्गी यांच्या हत्याकांडाच्या तपासातही संशयाची सुई सनातन आणि प्रखर हिंदुत्ववादी संघटनांवर रोखली गेली. या पाश्र्वभुमीवर गेल्या दोन दिवसांमध्ये आश्रमात घडलेल्या घडमोडींना विशेष महत्व आहे.