दहीहंडीची उंची २० फूट असावी आणि थरामध्ये १८ वर्षांखालील मुलांचा सहभाग नसावा, या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात गुरूवारी मुंबईतील गोविंदा पथकांकडून निषेध व्यक्त होताना दिसला. मुंबईच्या दादर परिसरात कोकणनगर या गोविंदा मंडळाकडून अनोख्या पद्धतीने न्यायालयाच्या निर्णयाबद्दल निषेध व्यक्त केला. कोकणनगर मंडळाने याठिकाणी झोपून नऊ थर लावले. दादर पश्चिमेला स्थानकाच्या परिसरात गेली ५० वर्षे हंडी उभारण्याची परंपरा आहे. ही दहीहंडी फोडण्यासाठी मुंबईतील अनेक नावाजलेली पथके हजेरी लावतात. कोकणनगर हेदेखील याच मंडळांपैकी एक आहे. मुंबईतील जुन्या गोविंदा पथकांपैकी एक म्हणून कोकणनगर मंडळाची ओळख आहे. गेल्या काही वर्षात हमखास आठ थर लावणारे पथक म्हणून या मंडळाने ओळख निर्माण केली होती. मात्र, यंदा न्यायालयाच्या २० फुटांच्या मर्यादेमुळे कोकणनगर गोविंदा पथकाला चारपेक्षा जास्त थर रचता येणार नाहीत. त्यामुळेच या मंडळाने निषेधाचे अस्त्र उपसले आले.
नियमभंगाची सलामी?
दरम्यान, मुंबईत इतर ठिकाणीही अशाचप्रकारे निषेधाचे सत्र सुरू आहे. जोगेश्वरी परिसरातील साईराम गोविंदा पथकाने डोळ्यावर काळी पट्टी बांधून चार थरांची सलामी दिली. आपल्या सरावाचे कसब दाखवण्यासाठी गोविंदा पथकाने ही सलामी दिली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्देशानंतर पोलिसांकडून मुंबईभरात दहीहंडीच्या उत्सवावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. चेंबूरमध्ये मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र २० फुटांची मर्यादा पाळायला मनसेने नकार दिल्यामुळे प्रशासनाने याठिकाणी २० फूटापर्यंत मार्किंग करुन ठेवले आहे. मनसेच्या दहीहंडीची उंची मोजण्यासाठी पोलिसांनी हे मार्किंग केले आहे.
ठाण्यात मनसेची ४० फुटांची ‘कायदेभंग’ दहीहंडी; न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान