जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वकाळात मांसविक्रीवर चार दिवसांची बंदी घातल्याच्या मीरा-भाईंदर महापालिकेच्या निर्णयाविरोधात समाजमाध्यमांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ट्विटरवर आज #meatban हा हॅशटॅग टॉप ट्रेंडिंग विषय ठरला आहे. अनेक सेलिब्रिटींनीही या बंदीचा निषेध व्यक्त केला आहे. तर काही ट्विटरकरांनी मुंबईचा उल्लेख ‘बॅनि’स्तान असा केला आहे. आपला देश अजूनही तिसऱया जगात वावरत असून मांसबंदीने आपल्या संकुचित मनोवृत्तीचे दर्शन घडले, या आशयाचे ट्विट अभिनेत्री सोनम कपूरने केले आहे. अनेकांनी मांस बंदीच्या निर्णयाची खिल्ली देखील उडवली आहे.

दरम्यान, मीरा-भाईंदरप्रमाणे मुंबई पालिकेनेही पर्युषणानिमित्त १० दिवस मांसविक्रीवर बंदी घालावी अशी मागणी भाजप नेत्यांनी आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे. दोन्ही महापालिकांमध्ये शिवसेना-भाजपची सत्ता आहे. त्यामुळे या निर्णयावरून विरोधकांनी सत्ताधाऱयांवर शरसंधान करण्यास सुरूवात केली आहे. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही भाजपच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तर ‘भारतीय जनता पक्ष’ आता ‘भारतीय जैन पक्ष’ झाल्याची टीका मनसेकडून करण्यात आली.