शहरातील सराईत गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी कठोर प्रतिबंधात्मक कारवाईस सुरुवात केली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किमान २५ सराईत गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्याकडून २५ ते ५० हजार रुपयांचे हमीपत्र घेण्याचे आदेश सिंग यांनी दिले आहेत.

त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्याने हद्दीतील सराईत, अभिलेखावरील (रेकॉर्डवरील) गुन्हेगारांची यादी तयार करून ती उपायुक्तांकरवी आयुक्त कार्यालयात पाठविण्यास सुरुवात केली आहे. आदेशानुसार महानगर दंडाधिकाऱ्यांप्रमाणेच समकक्ष अधिकारप्राप्त साहाय्यक आयुक्त (एसीपी) २५ ते ५० लाख रुपयांचे हमीपत्र भरून घेत आहेत. या हमीपत्रात भविष्यात गुन्हे केल्यास इतक्या रकमेचा दंड आकरला जाईल, असे नमूद करण्यात आले आहे.