उत्सवाच्या आकर्षणासोबतच मित्रमंडळींना भेटण्याचीही ओढ

हिंदू नववर्षांचा प्रारंभ म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रभर विशेषत: शहरी भागांत निघणाऱ्या स्वागतयात्रा हे एक महत्त्वाचे आकर्षण असते. त्यातही या यात्रांमध्ये मोठय़ा संख्येने सहभागी होणाऱ्या तरुणवर्गाबद्दल अनेकांना नवल वाटते. सण साजरा करण्याविषयी घरातून झालेल्या संस्कारांचे, रूढी, परंपरांचे पालन करण्याच्या उद्देशातून कुटुंबीयांबरोबर तरुण मंडळी या स्वागतयात्रेत सहभागी होत असली तरी गेल्या काही वर्षांत या स्वागतयात्रांच्या संकल्पनेत झालेला बदल तरुणांना खास आकर्षित करत आहे. पारंपरिक वेशभूषेत थाटात मिरवताना आपल्या संस्कृतीशी समरस होण्यासोबतच ‘गेट टुगेदर’ करण्याच्या इच्छेनेच अनेक तरुण-तरुणी स्वागतयात्रांत सहभागी होताना दिसतात.

बदलत्या जीवनशैलीनुसार स्वागतयात्रेत सहभागी होताना पारंपरिक वेशभूषेतच नावीन्य आणणे, ढोल-ताशांच्या गजरात ठेका धरणे, एखाद्या चौकात शाळा, महाविद्यालयाच्या मित्रमैत्रिणींना भेटून सेल्फी काढणे या ट्रेंडमुळे तरुणांना स्वागतयात्रा जास्त आपलेसे करते. स्वागतयात्रेचे औचित्य साधून एकाच दिवशी भल्या पहाटे तरुणांचे जथ्थे नेमके कोणत्या भावनेतून एकत्र येतात, सणाविषयीची आत्मीयता तरुणांना स्वागतयात्रेत आणते की मोठय़ा प्रमाणात असणारा तरुणांचा जल्लोष, पारंपरिक वेशभूषा, ढोलपथक यामुळे या सणाचा होणारा हा ‘सोहळा’ तरुणांना खुणावत असतो, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधींनी दादर, गिरगाव, ठाणे, डोंबिवलीतील तरुणांशी संवाद साधला असता, उत्सवाचा गोडवा हेच या आकर्षणाचे केंद्र असल्याचे दिसून येते.

डोंबिवलीच्या फडके रोडवर होणारा तरुणाईचा जल्लोष, ढोलपथकांचा नाद या गोष्टी स्वागतयात्रांत वेगळाच उत्साह भरतात, असे या स्वागतयात्रेत दरवर्षी सहभागी होणारा मिहिर धामणकर सांगतो. ‘‘एरवी आपापल्या कामांत व्यग्र असलेले मित्रमैत्रिणी यानिमित्ताने एकाच ठिकाणी भेटतात. नटूनथटून फोटो सेशन पार पडते,’’ असे सांगत तो स्वागतयात्रेतील सहभागाचे हेच प्रमुख कारण असल्याचे सांगतो. ठाण्यात राहणाऱ्या मनोज खाबडे याच्या मते, स्वागतयात्रेच्या निमित्ताने नववर्षांचा पहिला दिवस मित्रमंडळींसोबत मुक्तपणे जगता येतो. ‘‘मराठी नववर्ष आणि संस्कृती जोपासना असली तरी सेल्फी, ‘ग्रूफी’ आणि मौजमजा हेच स्वागतयात्रेत सहभागी होण्याचे मुख्य कारण आहे,’’ असे तो सांगतो.

स्वागतयात्रेचे हे आकर्षण केवळ मराठी किंवा हिंदू तरुणांमध्ये आहे, असे नाही. ठाण्यात राहणारा अबू सय्यद हा दरवर्षी न चुकता स्वागतयात्रेत सहभागी होतो. स्वागतयात्रेचा संबंध कोणत्याही धर्माशी जोडणे त्याला पसंत नाही. ‘‘ठाण्यासारख्या सांस्कृतिक शहरात वाढल्यामुळे मराठी मातीशी माझी नाळ घट्ट जोडली गेली आहे. हा समानता आणि बंधुभाव जपणारा ‘इव्हेंट’ आहे,’’ असे अबू सांगतो. अर्थात मित्रमंडळींना भेटायला मिळते, हे एक कारण त्याच्याही तोंडी आहेच. गिरगावातला अभिषेक पाष्टे याचे अमराठी मित्रही त्याच्यासोबत पारंपरिक वेशभूषेत स्वागतयात्रेत सहभागी होतात. ‘‘यानिमित्ताने त्यांची मराठी संस्कृतीशी ओळख होते, पण केवळ आपलीच संस्कृती उत्तम आहे, असा हेकेखोरपणा चुकीचा आहे. त्यामुळे मीदेखील त्यांच्या सण-उत्सवात तितक्याच उत्साहाने सहभागी होतो,’’ असे अभिषेक म्हणाला.

कुटुंबातील व्यक्तींसोबत लहानपणापासून जात असल्याने निर्माण झालेली ओढ, मिरवणुकीतील भारलेले वातावरण, उत्सवातील रंगीबेरंगी जल्लोष या गोष्टीही तरुणवर्गाला स्वागतयात्रेकडे घेऊन येतात. अर्थात अनेकांनी मराठी संस्कृती जपण्यासाठी स्वागतयात्रेत सहभागी होत असल्याचेही आवर्जून सांगितले. ज्या उत्साहात ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करतो, त्याच जल्लोषात हिंदू नववर्ष स्वागत करायलाच हवे, अशी मतेही काहींनी व्यक्त केली, तर काहींसाठी पारंपरिक वेशभूषा, ढोल वाजवण्याची हौस, नऊवारी नेसून बुलेट चालवण्याचा आनंद या गोष्टीही महत्त्वाच्या आहेतच!