पोलिसांसमोर नवा पेच; आरोपींच्या चाचण्या करून घेताना नाकीनऊ

जयेश शिरसाट, लोकसत्ता

मुंबई : संसर्गाची भीती, जाचक नियमांमुळे गुन्हेगारांची अटक आणि अटके नंतरची हाताळणी पोलिसांसाठी जिकरीची ठरत आहे. त्यामुळे किरकोळ गुन्ह्य़ांकडे दुर्लक्ष करून फक्त गंभीर गुन्ह्य़ांतल्याच आरोपींना अटक करण्याकडे पोलिसांचा कल आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना (न्यायालयीन कोठडीतील) फक्त तळोजा कारागृहात स्वीकारले जाते. तेही करोना चाचणी के लेली असल्यास. अन्यथा कारागृहातून आरोपी माघारी धाडले जातात. या नियमासह आरोपी आधीपासूनच बाधित असल्यास आपल्यालाही बाधा होऊ शके ल, या भीतीमुळे ताब्यात आल्याआल्याच पोलीस आरोपींची करोना चाचणी करून घेण्यासाठी धडपडतात. मात्र ही चाचणी करून घेताना पोलिसांची पुरती दमछाक होताना दिसते.

सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत चाचणी असली तरी तिथे संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो. तसेच रुग्णालयांमधील गर्दी, आरोग्य अधिकाऱ्यांची उपलब्धता यांमुळे आरोपींची चाचणी करून घेण्यासाठी अख्खा दिवस वाया जातो. त्यामुळे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची स्वखर्चाने खासगी प्रयोगशाळांमार्फत चाचणी करण्यास सुरुवात केली.

गंभीर गुन्हय़ांमध्ये पुरावे गोळा करण्यासाठी आरोपींना अनेक ठिकाणी फिरवावे लागते. या सर्व प्रक्रियेत पोलीस ठाण्यातील अनेक अधिकारी, अंमलदार आरोपीच्या संपर्कात येतात. त्यामुळे प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

हे अनुभव नवे नाहीत

’ नेहरूनगर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्य़ातल्या सात आरोपींना अटक के ली. नियमांप्रमाणे त्यांची जे. जे. रुग्णालयात करोना चाचणी करून घेण्यात आली. सातपैकी पाच आरोपी करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. १५हून अधिक अधिकारी, अंमलदार बाधित आरोपींच्या संपर्कात आले. त्यामुळे त्या सर्वाना विलगीकरणाच्या सूचना देण्यात आल्या.

’ सुरुवातीच्या काळात बांगूरनगर पोलीस ठाण्याने अटक के लेल्या आरोपीला चाचणी केल्याशिवाय घेणार नाही, अशी भूमिका तळोजा कारागृहाने घेतली. तेव्हा त्या आरोपीची चाचणी  के ली गेली आणि त्यात तो बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्या आरोपीच्या संपर्कात आलेल्या २५ पोलिसांनी चाचणी करण्यात आली.