नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे स्वप्न पूर्ण होत असून त्याचे महत्त्व या सरकारला पटले असल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या महामार्गाच्या कामांची पाहणी केली व प्रकल्पाची प्रशंसा केली. या महामार्गामुळे मागास किंवा दुर्लक्षित राहिलेला विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राचा भाग प्रगत भागाशी जोडला जाईल. त्यातून ग्रामीण भागाची प्रगती साधली जाईल. या महामार्गाबाबतची दूरदृष्टी व महत्त्व मुख्यमंत्री ठाकरे यांना पटले आहे.  स्वप्ने पूर्ण होण्यास अवधी लागतो. या महामार्गाला शिवसेनेने सुरुवातीला विरोध केला होता. पण मंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यावर शिवसेनेने पाठिंबा दिला होता. आमच्या सरकारच्या काळातच २० टक्के काम झाले होते. उर्वरित कामे वेगाने होत आहेत, याचा मला आनंदच आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.