शैलजा तिवले

शिबिरे, खेळाच्या स्पर्धाची कामे; खासगी वैद्यकीय सेवा देण्यास मोकळे रान

आरोग्यवर्धिनी (हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस) केंद्रामध्ये आधुनिक वैद्यकीय सेवा देण्यासाठी आयुर्वेद, होमियोपॅथी, युनानी आणि नर्सिगच्या पदवीधरांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. प्रशिक्षणार्थ्यांना रात्रपाळी, रक्तदान शिबिरे, खेळांच्या स्पर्धा अशी कामे लावली जात असल्याने एकीकडे प्रशिक्षणार्थीचे नुकसान होत आहे, तर दुसरीकडे खासगी वैद्यकीय सेवा देण्यास मुभा असल्याने काही डॉक्टरांना मोकळे रान मिळाले आहे.

केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान’ योजनेंतर्गत राज्यातील उपकेंद्राचा विस्तार करून उभारण्यात आलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) म्हणून आयुर्वेद, होमियोपॅथी, युनानी आणि नर्सिगच्या पदवीधरांची नियुक्ती केली आहे. त्यापूर्वी सहा महिन्यांचे प्रशिक्षण जिल्हा रुग्णालय स्तरावर दिले जाते. प्रत्येक विद्यार्थ्यांमागे जवळपास ८० हजार रुपये खर्च यासाठी सरकारकडून केला जात आहे. याची पहिली तुकडी केंद्रामध्ये रुजू झाली असून, ऑगस्टपासून दुसऱ्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. प्रत्येक दिवसानुसार विषयांचे सत्र आणि प्रात्यक्षिके याचे वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ठरवून दिले आहे. मात्र प्रत्यक्षात हे वेळापत्रकाला बगल देत रुग्णालयांनी गरजेनुसार प्रशिक्षणार्थीना कामाला जुंपले आहे.

प्रशिक्षणार्थीना विविध पाळ्यांमध्ये कामे लावली जात आहेत. त्यामुळे रात्रपाळी किंवा दुपारच्या पाळीमध्ये येणाऱ्या प्रशिक्षणार्थीना सकाळच्या वेळेतील सत्रांना बसता येत नाही. तसेच काही प्रशिक्षणार्थीना रक्तदान शिबिरे, जिल्हास्तरीय खेळाच्या स्पर्धा अशा बाहेरील कामांसाठी वारंवार पाठविले जाते. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी सर्रास अनुपस्थित राहून प्रशिक्षणार्थीच बाह्य़रुग्णांना वैद्यकीय सेवा देत आहेत. रुग्णालयांच्या हलगर्जीपणामुळे मात्र रुग्णांना याचा फटका बसत आहे.

प्रशिक्षणार्थीना खासगी वैद्यकीय सेवा देण्यास मुभा असल्याने काही डॉक्टरांना मात्र यामुळे मोकळे रान मिळाले आहे. यातील काही डॉक्टर रात्रपाळी करत दिवसा खासगी वैद्यकीय सेवा देत आहेत. हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षणार्थीना दहा हजार रुपये मानधन दिले जाते. मात्र रुग्णालयानेच सूट दिल्याने काही प्रशिक्षणार्थी केवळ वेळ मारून नेण्याचे काम करीत असल्याचे परभणी प्रशिक्षण केंद्रावरील सूत्रांनी सांगितले. राज्यभरातील सर्व प्रशिक्षण केंद्रांवर अशीच परिस्थिती आहे.

रुग्णालयांच्या बाहेरील कामांसाठी प्रशिक्षणार्थीना पाठविण्याची गरज नाही. या प्रशिक्षणावर देखरेख करणारे प्राचार्य दर दोन-तीन आठवडय़ांनी केंद्रावर भेट देतात. यासंबंधी अधिक माहिती घेऊन योग्य ती पावले उचलली जातील, असे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर अंकुश नाही

नोडल वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे विद्यापीठाच्या मार्गदर्शक अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण होत नाही. ठरवून दिलेल्या सत्रांपैकी केवळ तासिका केंद्रामध्ये होत आहेत. प्रात्यक्षिकेच होत नसल्याने आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये रुजू झाल्यावर गर्भवती माता, नवजात बालकांची तपासणी, संसर्गजन्य आजारांसह असंसर्गजन्य आजारांची तपासणी, उपचार, मानसिक आजारांचे व्यवस्थापन या सेवा कशा देणार, असा प्रश्न प्रशिक्षणार्थीनी उपस्थित केला आहे. नोडल वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हातात प्रशिक्षणार्थीचे अंतर्गत गुण असल्याने त्यांच्याविरोधात बोलणे शक्य नाही. प्रशिक्षणाच्या कामकाजावर देखरेख करणारी यंत्रणा कागदी असल्याने प्रत्यक्षात केंद्रामध्ये काय घडते आहे, याची पडताळणी केली जात नसल्याची तक्रारही प्रशिक्षणार्थीनी केली आहे.