महामार्गावर होणाऱ्या अपघातांची देशभरातील आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्राचा क्रमांक पहिल्या तिघांमध्ये येतो. यात महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या जास्त असून ट्रक, बस, टँकर यासारख्या अवजड वाहनांची टक्कर होऊन झालेल्या अपघातांचे प्रमाण मोठे आहे. हे लक्षात घेऊन अवजड वाहन चालवणाऱ्यांना ‘ड्रायव्हिंग सिम्युलेटर्स’च्या मदतीने खास प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे. पुणे आणि औरंगाबाद येथे अशापद्धतीने प्रशिक्षण देणारी केंद्रे सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहेत.
महाराष्ट्रात अपघातांची आकडेवारी मोठी असल्याने अवजड वाहनचालकांना वेगळ्या पद्धतीने प्रशिक्षण देण्याची योजना ‘वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशन’ने (डब्ल्यूआयएए) आखली आहे. त्यासाठी ‘ड्रायव्हिंग सिम्युलेटर्स’ची मदत घेण्यात येणार आहे. ‘सिम्युलेटर्स’ ही अत्याधुनिक, अद्ययावत यंत्रणा आहे. या यंत्रणेवर वाहनचालक थ्रीडी सॉफ्टवेअरचा वापर करून स्टीअरिंग व्हील, ब्रेक, अ‍ॅसिलेटर, गीअर बदलण्याचा सराव करू शकतात. प्रत्यक्ष  वाहन चालवण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्यांना प्रशिक्षण देऊन तयार करण्यात येणार आहे. यासाठी ‘डब्ल्यूआयएए’ने पुणे आणि औरंगाबादमध्ये याप्रकारची प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध करून दिली असून सप्टेंबरपासून तिथे प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे.