रुग्णांसाठी उभारलेल्या ‘नोटाबदल’ केंद्राचा फायदा स्वत:साठी

‘चलनकल्लोळा’त अडकलेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी केईएम रुग्णालयात उभारण्यात आलेल्या मदतकक्षाचा येथील कर्मचारी आणि बाहेरील नागरिकच गैरफायदा घेत असल्याचे दिसून आले आहे. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना आपल्याजवळील ५००-१०००च्या नोटा बदलून सुटे पैसे घेता यावे, यासाठी बँक आणि पोस्टातर्फे उभारण्यात आलेल्या या मदतकक्षात कर्मचारी व बाहेरील नागरिकांचीच जास्त गर्दी दिसत आहे. विशेष म्हणजे, रुग्णालयाचे कर्मचारी ‘ही सुविधा आमच्यासाठी आहे’ असे सांगून रुग्णांच्या नातेवाईकांना मदतकक्षातून हुसकावून लावत आहेत.

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर रुग्णांना सुटय़ा नोटांच्या अभावी दुकानांतून औषधे मिळणेही कठीण झाले होते. अनेक खासगी रुग्णालयांत तर चलनातील नोटा असल्याखेरीज रुग्णांना प्रवेश देण्यात येत नव्हता. या पाश्र्वभूमीवर केईएम रुग्णालयाने पुढाकार घेऊन भारतीय पोस्ट आणि पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्याने मंगळवारपासून मदत केंद्र सुरू केले. प्रत्येक रुग्णाने रुग्णालयाचे नोंदणी कार्ड दाखवून ‘बाद’ नोटांच्या बदली नोटा घेऊन जाव्यात, असे आवाहन ‘केईएम’तर्फे करण्यात आले होते. मात्र, बुधवारी रुग्णांपेक्षा स्थानिक आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनीच गर्दी केली. ‘रुग्णालयाने पोस्टाचे मदत केंद्र आमच्यासाठी सुरू केले आहे. आम्हाला पैसे बदलून घेण्यासाठी वेळ नाही, रांगेत उभे राहण्यात वेळ गेला तर तुमचे वैद्यकीय अहवाल मिळणार नाहीत,’ असे म्हणत रुग्णांवर मुजोरी केली जात होती. रुग्णालयाचे कर्मचारी, स्थानिक यांनी केलेल्या गर्दीमुळे रुग्णांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागले. आम्ही गेले दोन तास रांगेत उभे आहोत पण बाहेरील नागरिक येऊन रांगेत उभे राहत आहेत, अशी तक्रार रुग्णांकडून केली जात आहे.

गेल्या मंगळवारी नोटांवर बंदी घातल्यानंतर सरकारी रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. सुटे पैसे नसल्यामुळे मेडिकलच्या दुकानातून औषधे घेणे अवघड झाले होते. आठवडय़ाभरानंतरही बँकांसमोर आणि एटीएमच्या बाहेरील रांगा कमी होत नसल्यामुळे रुग्णांकडे उपचारासाठी पैसे उपलब्ध नव्हते. केईएम रुग्णालयाने रुग्णांसाठी दोन दिवसांपासून मदत केंद्र सुरू केले असले तरी तेथे व्यवस्थेचा अभावच पाहण्यात येत होता. ‘पंजाब नॅशनल बँकेने रुग्णांना सेवा देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे, तर पोस्टाचे मदत केंद्र केईएमच्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे जरी असले तरी केईएममधील मदत केंद्रात रुग्णांना प्राधान्य देण्यात आले आहे,’ असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.