महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्या दादर येथील शिवाजी पार्कवर होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात शपथ घेणार आहेत. यापार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने बुधवारी या कार्यक्रमाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच संबंधितांना खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.

गुरुवारी या कार्यक्रमादरम्यान शिवाजी पार्कवर लाखोंच्या संख्येने लोक जमा होतील. नेहमी शिवाजी पार्कवर अशा प्रकारचे सोहळे होत नाहीत. मात्र, सार्वजनिक मैदानांवर अशा सोहळ्यांचे पायंडे पाडू नका, असा सल्लाही कोर्टाने दिला आहे. त्याचबरोबर उद्या होणाऱ्या सोहळ्याच्या सुरक्षेबाबत खबरदारी घ्या असे आदेशही हायकोर्टाने संबंधीत यंत्रणांना दिले आहेत. न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. आर. आय छागला यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. ही काळजी व्यक्त करताना कोर्ट उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीविरोधात नाही असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे.

खंडपीठाने म्हटले, “उद्याच्या सोहळ्याबाबत आम्हाला काहीही म्हणायचे नाही. मात्र, कोणतीही अप्रिय घटना घडू नये अशी आम्ही प्रार्थना करतो.” विकॉम ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेने उद्याच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान आहे की कार्यक्रमांचे? असा सवाल त्यांनी याचिकेतून उपस्थित केला आहे. या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने ही चिंता व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती आहेत जे मुख्यमंत्री होणार आहेत. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे ते नेतृत्व करणार आहेत.