पोलिसांच्या असंवेदनशीलतेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

बलात्कारातून गर्भवती राहिलेल्या १३ वर्षांच्या मुलीला २४व्या आठवडय़ांत गर्भपात करण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी परवानगी दिली. या मुलीची काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश येथून सुटका केल्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. त्या वेळी ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र त्याबाबत पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना कळवलेच नाही. परिणामी एवढय़ा लहान वयात २० आठवडय़ांपेक्षा जास्त कालावधीचा गर्भपात करण्याची वेळ तिच्यावर आल्याची गंभीर दखल न्यायालयाने घेताना पोलिसांच्या असंवेदनशीलतेबाबत नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे यासारखी प्रकरणे पोलिसांनी कशी हाताळावीत याबाबत परिपत्रक वा मार्गदर्शिका आहेत का, अशी विचारणा करत असे परिपत्रक वा मार्गदर्शिका नसेल तर तातडीने ते करण्याचे आदेश देण्यात येतील, असेही स्पष्ट केले.

मुलीच्या वतीने तिच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने या मुलीला २४व्या आठवडय़ात गर्भपात करण्याची अखेर परवानगी दिली. कायद्यानुसार २० आठवडय़ांपर्यंतच्या गर्भपातास परवानगी आहे. मात्र त्यापुढे गर्भपात करायचा असल्यास त्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी आवश्यक असून अपवादात्मक प्रकरणांमध्येच ही परवानगी दिली जाते. गेल्या आठवडय़ात न्यायालयाने या मुलीशी संवाद साधल्यानंतर जे. जे. रुग्णालयाला वैद्यकीय मंडळाला तिची वैद्यकीय चाचणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. सोमवारच्या सुनावणीत या मुलीच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला.  अहवाल पाहिल्यानंतर न्यायालयाने या मुलीला गर्भपात करण्याची परवानगी दिली. त्यासाठी मंगळवारीच जे. जे. रुग्णालयात दाखल होण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

  • हाजी-मलंग येथील या मुलीचे अपहरण झाले होते. याच परिसरात काम करणाऱ्या एका २३ वर्षांच्या तरुणाने गेल्या वर्षी जुलै महिन्यात तिचे अपहरण करून तिला उत्तर प्रदेश येथे नेले होते.
  • या प्रकरणी तिच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध लावून तिला परत आणले होते. त्याचप्रमाणे आरोपीला अटक केली. त्यानंतर गेल्या १७ मार्च रोजी तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्या वेळी ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, ही बाब पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना कळवली असती तर वेळीच तिचा गर्भपात करण्यात आला असता.