मुंबईत पोलीस भरतीवेळी चार उमेदवारांचा मृत्यू झाल्याची मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली असून, राज्याचा गृह विभाग आणि पोलीस महासंचालक यांना नोटीस बजावली आहे. सात दिवसांमध्ये नोटिसीला उत्तर देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
या भरतीप्रक्रियेविषयी ‘ऑल महाराष्ट्र ह्युमन राईट्स असोसिएशन’ या संस्थेने उच्च न्यायालयाला पत्र लिहिले होते. सध्याच्या पोलीस भरतीमध्ये उमेदवारांना अमानवी वागणूक दिली जात असल्याबद्दल पत्रात उल्लेख आहे. पोलीस भरतीवेळी चार जणांचा बळी गेला असून, पाज जण रूग्णालयात उपचार घेत आहेत. योग्य नियोजन करून भरती प्रक्रिया व्हायला हवी. उमेदवारांना राहण्याची, रूग्णवाहिकेची तसेच इतर मूलभूत सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेसाठी पोलीसांना विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात यावी. तसेच या सर्व प्रकरणावर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती नेमण्यात यावी, अशी विनंती संस्थेतर्फे करण्यात आली आहे. याच पत्राची दखल घेऊन उच्च न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल करून घेत संबंधितांना नोटीस बजावली.