सर्वाधिक इमारती घाटकोपर परिसरात; ५२ इमारती पालिकेच्या मालकीच्या

मुंबई : मुंबईमध्ये सध्या ४८५ अतिधोकादायक इमारती आहेत. मार्च महिन्यात पालिके ने सर्वेक्षण केले तेव्हा अतिधोकादायक इमारतींची यादी तयार करण्यात आली. यापैकी काही इमारती पाडून टाकण्यात आल्या आहेत. सध्या उभ्या असलेल्या अतिधोकादायक इमारतींपैकी ५२ इमारती पालिकेच्या मालकीच्या असून सर्वाधिक अतिधोकादायक इमारती घाटकोपर परिसरात आहेत.

दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर पालिकेतर्फे मुंबईतील अत्यंत धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. शहर व उपनगरातील सर्व खासगी व पालिकेच्या मालकीच्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. त्यात ज्या इमारती तत्काळ पाडून टाकणे आवश्यक आहे अशा इमारती सी-वन या प्रकारात अर्थात अतिधोकादायक म्हणून गणल्या जातात. अशा अत्यंत धोकादायक ४८५ इमारतींची यादी पालिकेने जाहीर के ली होती. तीन वर्षांपूर्वी मुंबईत तब्बल ६१९ अतिधोकादायक इमारती आढळून आल्या होत्या. त्यानंतर ही संख्या दरवर्षी कमी होऊ लागली. गेल्यावर्षी ४४३ धोकादायक इमारती होत्या. धोकादायक इमारतींपैकी काही इमारती पाडून टाकण्यात आल्या. काही इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. काही इमारतींवरील कारवाईला न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे. त्यामुळे अनेक इमारतींची नावे गेल्या अनेक वर्षांपासून तशीच आहेत. त्यात पंजाब कॉलनीतील २५ इमारतींचा समावेश आहे.

पालिकेच्या धोरणानुसार ३० वर्षे जुन्या इमारतींची संरचनात्मक तपासणी केली जाते. त्यात ज्या इमारती धोकादायक आढळतात, अशा इमारतींना घरे रिकामी करण्याची नोटीस दिली जाते. त्यानुसार यंदाही नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र काही रहिवाशांचे वाद असतील तर न्यायालयात धाव घेतात किंवा त्यांना इमारत धोकादायक वाटत नसेल तर ते पालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे जातात. त्यामुळे त्या इमारती तशाच अवस्थेत राहतात. एखाद्या इमारतीबाबत न्यायालयाने स्थगिती आदेश दिला असल्यास ती इमारत पाडून टाकता येत नाही. त्यामुळे या इमारती धोकादायक अवस्थेत असल्याबद्दल पालिके कडे बोट दाखवले जाते, अशी प्रतिक्रिया पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

वर्षांनुवर्षे तशाच असलेल्या इमारती

अतिधोकादायक इमारतींच्या यादीत ए विभागातील बेस्टच्या मालकीची मेहेर मेन्शन, ताडदेव येथील गंगा जमुना चित्रपटगृह, लालबागचे गणेश टॉकीज, शीव येथील पंजाबी कॉलनीतील सर्व २५ इमारती अशा इमारतींचा गेल्या अनेक वर्षांपासून समावेश आहे. भायखळा, डोंगरी, गिरगाव या भागांत सर्वात जुन्या इमारती असल्या तरी त्या उपकर इमारती असल्यामुळे पालिकेच्या यादीत या भागातील खासगी धोकादायक इमारतींची संख्या सर्वात कमी आहे.

दुर्घटनाग्रस्त इमारतीचा समावेश नाही

मालवणी येथे बुधवारी दुर्घटना घडली त्या भागात म्हणजेच मालाड पूर्व व मालाड पश्चिम परिसराचा भाग असलेल्या पी उत्तर भागात २५ इमारती अतिधोकादायक आहेत. मात्र बुधवारी पडलेल्या इमारतीचा त्यात समावेश नाही. अतिधोकादायक इमारतींची यादी तयार करताना त्यात ३० वर्षे जुन्या अधिकृत इमारतींचा विचार केला जातो. या इमारतीचा वरचा भाग हा अनधिकृत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा भाग तोडून टाकणे आवश्यक होते. मात्र त्यासाठी पालिकेच्या अधिकारांना मर्यादा असल्याची प्रतिक्रियाही अतिक्रमण निर्मूलन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.