परीक्षेला बसावं की बसू नये.. अभ्यास झाला नसला की हा प्रश्न परीक्षेच्या तोंडावर सारखा छळू लागतो. पण एकदा का अर्ज भरण्याची मुदत टळून गेली की या विचारालाही काही अर्थ नसतो. कारण अर्जच करता येणार नसल्याने इच्छा झाली तरी किंवा दहा-बारा दिवसांत रट्टा मारून अभ्यास केला तरी काहीच उपयोग नसतो. अर्थात दोनच वर्षांपूर्वी कसेबसे दहावी-बारावीच्या मांडवाखालून जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा तोही प्रश्न राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोडविला. आणि अगदी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत ऑनलाइन अर्ज करून परीक्षेला बसण्याची संधी राज्यभरातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. सध्या या सुविधेचा सर्वात जास्त फायदा कुणाला होत असेल तर तो आहे मुंबईतील विद्यार्थ्यांना. कारण विलंब, अति विलंब शुल्कानुसार अर्ज भरण्याची मुदत टळून गेली तरी अगदी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरणारे सर्वाधिक विद्यार्थी मुंबईत आहेत.
यंदा बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीला सुरू झाली. परंतु मुदत उलटून गेल्यानंतरही सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी अर्ज भरून परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. परीक्षा सुरू होण्याआधीच्या पाच-दहा दिवसांतील ही संख्या आहे. दहावीचेही तसेच. दहावीची विलंब शुल्कानुसार अर्ज भरण्याची मुदत उलटून गेली आहे. तरीही विद्यार्थ्यांचे १ मार्चपासून सुरू होणाऱ्या परीक्षेकरिता अर्ज भरणे सुरू आहे. दहावीच्या अशा ४०० विद्यार्थ्यांचे अर्ज आतापर्यंत आमच्याकडे आल्याचे मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव एस. वाय. चांदेकर यांनी सांगितले. असे परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मुंबईत सर्वाधिक असल्याची पुस्तीही जोडली. जितके दिवस विलंब होईल त्यानुसार शुल्क वाढत जाते. हे वाढीव शुल्क भरण्याची तयारी असेल तर विद्यार्थी परीक्षेला बसण्याचा निर्णय अगदी आदल्या दिवसापर्यंत घेऊ शकतात, अशी माहिती चांदेकर यांनी दिली.