रायगड जिल्ह्यतील विविध भागांत जाऊन कमी गजबज असलेल्या ठिकाणाची टेहळणी करायची आणि नंतर त्या घरात चोरी करायची, हा त्याचौघांचा उद्योग होता. मात्र, पोलिसांना त्यांच्या कृष्णकृत्यांचा सुगावा लागला. एक उच्चशिक्षित तरुणच या टोळीचा म्होरक्या निघाला.

खालापूर, कर्जत, पेण, रोहा, माणगाव आणि अलिबाग परिसरात गेल्या काही महिन्यापासून चोऱ्या आणि घरफोडय़ांचे प्रमाण वाढले होते. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे पोलीसही हैराण झाले होते. अनेक प्रयत्न करूनही चोऱ्या आणि घरफोडय़ांची उकल करण्यात पोलिसांना यश येत नव्हते. चोरीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवण्याची सूचना जिल्हा अधीक्षकांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या होत्या. मात्र, चोरांचा एकही धागादोरा सापडत नव्हता.

निरनिराळ्या पातळ्यांवर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे कर्मचारी आणि अधिकारी या प्रकरणांचा तपास करत होते. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग या सर्व तपासावर लक्ष ठेवून होते. चोरी आणि घरफोडीच्या प्रकरणांमध्ये यापूर्वी अटक झालेल्या आरोपींची कसून तपासणी सुरू होती. त्यांच्या चौकशीतूनही काही हाती लागत नव्हते. अशातच खालापूर पोलिसांना सावरोली गोरठण परिसरात काही जण संशास्पदरीत्या वावरत असल्याची जुजबी माहिती प्राप्त झाली. या सर्वावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. कधी खबऱ्यांच्या मदतीने तर कधी साध्या वेशातील पोलिसांच्या मदतीने माहिती संकलन करण्याचे काम सुरू होते. पण काही महत्त्वाचा पुरावा हाती लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी संयम बाळगण्याचे ठरवले. ठोस कारवाई करण्यापूर्वी नीट चाचपणी करणे आवश्यक होते.

सुमारे १८ ते ३० वयोगटातील हे तरुण फारसे काम करत नसले तरी त्यांच्याकडे खर्चासाठी मुबलक पैसा येत असल्याचे पोलिसांच्या नजरेतून सुटले नव्हते. या चौघांचे राहणीमान अचानक सुधारल्याचे पोलिसांनी संकलित केलेल्या माहितीत आढळले होते. त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावला. अशातच यातील एकाकडे अनेक प्रकारचे मोबाइल असून तो गावातील लोकांना मोफत अथवा अत्यल्प दरात वापरण्यास देत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. याच माहितीचा आधार घेऊन पोलिसांनी या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.  हे प्रकरण मोबाइल चोरीपर्यंत मर्यादित असेल, असा अंदाज पोलिसांना होता. मात्र चौकशीत भलतीच माहिती समोर आली. मोबाइल सोबत आसपासच्या परिसरात चोऱ्या आणि घरफोडय़ा केल्याची कबुली त्याने दिली. यात गावातील अन्य दोघांचेही सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले. या माहितीच्या आधारे अन्य दोघांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस आदिवासी वाडीवर दाखल झाले. पोलीसांची चाहूल लागताच एकाने पलायन केले. पण दुसरा पोलिसांच्या सापळ्यात अडकला. त्याच्या चौकशीत आणखीन माहिती पुढे आली.

गोरठण येथील हेमंत भदाणे हा या गुन्ह्यामागील मूळ सूत्रधार असल्याची माहिती आता पोलिसांच्या हाती लागली. सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेला उच्चशिक्षीत तरुण असून आपल्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा तो गुन्हेगारी कामांसाठी वापर करत असे. जिल्ह्यातील विविध भागात हेमंत सुरुवातीला टेहळणी करत असे. पुरेशी पाहणी करून चोरी आणि घरफोडय़ांची ठिकाणे निश्चित केली जात. या कामासाठी हेमंत आपल्याकडील पिकअप गाडीचा वापर करत असे. दिवसा टेहळणी केल्यानंतर रात्री याच गाडीतून तिघांना घेऊन ठरलेल्या ठिकाणी जात असे, मग उर्वरित तिघे नियोजनानुसार चोऱ्या आणि घरफोडय़ा करत तर हेमंत गाडीत बसूनच आसपासच्या परिसरावर पाळत ठेवत असे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हेमंत आणि फरार झालेल्या तिसऱ्या साथीदाराला जेरबंद केले. चौकशीदरम्यान आणखी नवीन माहिती समोर आली. हेमंत याने चोरटय़ांची टोळी स्थापन करण्यापूर्वी अलिबागमधील सहा ते सात पतसंस्थांना लाखो रुपयांचा गंडा घातला होता. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने पतसंस्थांची फसवणूक करून लाखो रुपये उकळले होते. चोऱ्या आणि घरफोडय़ांमध्ये लुटलेले सोने कर्जत येथील वित्त कंपनीकडे गहाण ठेवून त्यावर त्याने कर्ज घेतल्याचेही तपासात निष्पन्न झाले. मंदिरांतील दानपेटय़ांवरही या चौघांनी डल्ला मारल्याची बाब समोर आली आहे.

या गुन्ह्याचा तपास जसा पुढे सरकत गेला, तसे यातील वेगवेगळे पैलू उलगडत गेले. मोबाइल हँण्डसेटपासून सुरू झालेला तपास चोऱ्या, घरफोडय़ा आणि फसवणुकीच्या गुन्ह्यापर्यंत येऊन पोहोचला. निरनिराळ्या पातळीवर केलेला सखोल तपास, मिळालेल्या माहितीची योग्य प्रकारे घातलेली सांगड, तपासात दाखवलेला संयम महत्त्वाचा ठरला आणि उच्चशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनीअरने अशिक्षित बेरोजगार तरुणांना सोबत घेऊन स्थापन केलेल्या टोळीचा उलगडा झाला. या तपासात पोलीस निरीक्षक जमील शेख, हवालदार सुभाष पाटील, पोलीस नाईक सागर शेवते, पोलीस शिपाई संदीप चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि हेमंत नथू भदाणे, दत्ता राम पवार, विलास ऊर्फ भुरिया नाना वाघमारे आणि गजानन मधू हिलम यांना अटक केली असून चोरीच्या माध्यमातून त्यांनी लुटलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि चोरलेले २८ मोबाइल जप्त केले आहेत.