महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

मुंबई : आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीपर्यंतच्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा समावेश नसल्यावरून वादंग झाल्यानंतर आता सहावीच्या पुस्तकांत शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा समावेश करणार असल्याचे स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने गुरूवारी दिले.

गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ राज्यमंडळाचे चौथीचे इतिहासाचे पाठय़पुस्तक शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीवर आधारित आहे. असे असताना महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीपर्यंतच्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा समावेश नसल्याचे ‘लोकसत्ता’ने गुरूवारी उजेडात आणले. त्याबाबत मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे बुधवारी विचारणा केली असता मंडळाचे संचालक विशाल सोळंकी, सचिव विकास गरड यांनी याविषयी बोलण्यास नकार दिला होता. ‘शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा चौथीच्या पुस्तकात समावेश नाही. याबाबत मंडळाची काय भूमिका आहे?’ असा प्रश्न अभ्यासक्रम विकसन समितीच्या प्रमुख प्राची साठे यांना विचारला असता त्यांनीही कोणता प्रतिसाद दिला नव्हता. चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास वगळण्यावरून गुरूवारी वादंग निर्माण झाला. त्यानंतर ‘महाराष्ट्रातील प्राचीन व मध्ययुगीन काळातील समृद्ध राजसत्ता, छत्रपती शिवरायांचे कार्य, त्यांचे प्रशासन, तत्वे, नीति आणि शिवचरित्र आजही आदर्श का आहे, याची ओळख इयत्ता सहावीमध्ये स्वतंत्रपणे करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे,’ असे स्पष्टीकरण महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाकडून देण्यात आले.

‘आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम हा संकल्पनाधीष्ठीत असून पहिली ते चौथीपर्यंत कोणताही विषय स्वतंत्र नाही. असा अभ्यासक्रम तयार करण्यामागे प्राथमिक स्तरावर मुलांचे संबोध, अवबोध स्पष्ट व्हावेत अशी मंडळाची भूमिका आहे. समाज निर्मिती, शासन-प्रशासन, राज्य आणि राज्यकर्ते या संकल्पना सर्वप्रथम स्पष्ट करण्यात आल्या असून इतिहासाची मांडणी करताना कालमापन पट्टीही डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक असते. इतिहासाच्या नव्या आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार इतिहास केवळ युद्ध आणि संघर्षांपुरता मर्यादित नसून त्याला सामाजिक, आर्थिक, राजकीय असे अनेक आयाम असतात. हे लक्षात घेऊन राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात इतिहासाची एक विषय म्हणून ओळख पाचवीपासून करून देण्यात येणार आहे. तर सहावीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एका वेगळ्या अंगाने देण्याचे  मंडळाने ठरविले आहे. सहावीचा वयोगट हा मुलांच्या किशोरवयीन अवस्थेची सुरुवात असल्याने याच संस्कारक्षम वयात वेगळ्या दृष्टीने विचार करण्याची क्षमता मुलांमध्ये अधिक असते. म्हणूनच छत्रपती शिवरायांचा इतिहास हा या वयोगटाला अधिक प्रेरणादायी आणि विचारास प्रवृत्त करणारा ठरेल,’असे स्पष्टीकरण महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय मंडळाच्या अभ्यासक्रम विकसन समितीच्यावतीने मंडळाचे सचिव विकास गरड यांनी केले आहे.