विधान परिषदेतील दोन राज्यपाल नियुक्त रिक्त जागांवर राष्ट्रवादीच्या शिवाजी गर्जे आणि आदिती नलावडे यांची नियुक्ती करण्याची शिफारस राजभवनला करण्यात आली असली तरी गेले दोन आठवडे या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. विधान परिषदेत १२ सदस्यांची राज्यपालांकडून नियुक्ती केली जाते. राहुल नार्वेकर आणि रामराव वडकुते या दोघांच्या राजीनाम्यामुळे या जागा रिक्त झाल्या. या दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या कोटय़ातील होत्या. या रिक्त जागांवर शिवाजी गर्जे आणि आदिती नलावडे यांची नियुक्ती करण्याची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दोन नावांचा प्रस्ताव राजभवनला पाठविला आहे. परंतु दोन आठवडे उलटले तरी राजभवनकडून या नावांना मान्यता देण्यात आलेली नाही.

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची मुदत येत्या जून महिन्यात संपत आहे. आमदारांचा सहा महिन्यांचाच कालावधी शिल्लक असल्याने या दोघांच्या नियुक्त्या करण्याबाबत राजभवनने आक्षेप घेतल्याचे समजते. राजभवनकडे प्रस्ताव प्रलंबित असल्यानेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पुढील आठवडय़ात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना दोघांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करावी म्हणून विनंती करणार आहेत.

महाविकास आघाडी सरकार आणि राजभवनमध्ये हळूहळू संघर्ष वाढत जाईल, अशी शक्यता वर्तविली जाते. विधान परिषदेवरील नियुक्त्या ही त्याची सुरुवात असल्याचे मानले जाते.