Happy Holi 2019 : होळी आणि धुलिवंदनच्या दिवशी फुगे मारणा-यांवर यंदा करडी नजर असणार असून, असा थिल्लरपणा करताना पकडला गेल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. असे कृत्य करणाऱ्यांविरोधात पोलीस कडक कारवाई करणार आहेत. धुलिवंदनाच्या आठवडाभर आधीच फुगे मारण्याचा थिल्लरपणा केला जात असून, त्यात अनेकदा डोळा निकामी होण्याचे प्रकारही घडत आहे.

होळीत वापरल्या जाणाऱ्या रासायनिक रंगामध्ये वाळू, काच, पावडर, शिसे यासह इतरही घातक पदार्थ असतात. ते डोळ्यात गेल्याने दरवर्र्षी २० हून अधिक जणांच्या डोळ्यांवर परिणाम होतो. मेडिकल, मेयो, डागा या तीन शासकीय रुग्णालयांत या काळात अशाप्रकारे सुमारे २० ते ३० तर खासगी रुग्णालयात याहून दुप्पट रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सार्वजनिक ठिकाणी रंगाचे पाणी टाकल्यास कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेकरिता खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी अश्लील बोलणे किंवा अश्लील गाणी बोलणे, हातवारे करणे यावर नजर ठेवण्यासोबतच रस्त्याने जाणाऱ्यांवर रंगाचे पाणी फेकले जाऊ नयेत याकरिता सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ नुसार असे प्रकार समोर आल्यास कारवाई केली जाईल.